पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागणाऱ्या तोतया पोलिसाला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. आरोपीने आपण घाटकोपर एसीएस येथे कार्यरत असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. तसेच बनावट ओळखपत्रही दाखवले होते. याप्रकरणी बांगुर नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. निलेश पोखरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याने रविवारी रात्री मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून काही व्यक्ती आपल्याला मारण्याची धमकी देत असून आपल्याला सुरक्षा हवी असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने आपण पोलीस अंमलदार असून घाटकोपर एटीएस येथे कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण बारमध्ये दुचाकीची चावी विसरलो असून बारमधील कर्मचारी चावी शोधण्यात मदत करत नसल्याचे सांगितले. पण तपासणीत तसे काहीच नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीने पोलिसांना ओळखपत्र दाखवले. त्यावरील निवृत्तीच्या तारखेवरून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीकडील ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पोखरकरला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी चौकशीत त्याने ओळखपत्र बनावट असल्याचे मान्य केले. त्यानंतर तोतयागिरी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.