भिवंडीतील टोळीचे अजब कृत्य उघड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भिवंडी तालुक्यातील डुंगे पोस्ट ऑफिस. कार्यालयात दोन-तीन अधिकारी- कर्मचारी कामात मग्न, समोरच्या भिंतीवर राष्ट्रपुरुषांच्या तसबिरी. टेबलावर फाइल्स. मात्र कार्यालयात लोकांची वानवा. तुमच्या किसान विकासपत्रावर आठवडाभरात बोजा चढवून देतो, हे तेथील अधिकाऱ्याचे आश्वासन. वेळेत काम झाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकून आम्ही परत आलो.. त्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा त्याच किसान विकासपत्राची खातरजमा करण्यासाठी भिवंडीत पोहोचलो. अंजूर फाटय़ावर उभ्या असलेल्या रिक्षावाल्यास, डुंगे पोस्ट ऑफिसला चला असे सांगितले. थोडय़ाच वेळात रिक्षा पोस्ट ऑफिससमोर उभी राहिली. पण भलत्याच ठिकाणी. हे डुंगे पोस्ट ऑफिस. मग त्या दिवशी कुठल्या पोस्ट ऑफिसात गेलो होतो. क्षणभर काळजाचा ठोका चुकला. काही तरी गडबड आहे. तातडीने आम्ही मुंबईत पोहोचलो आणि वरिष्ठांना कल्पना दिली.. त्यांच्या सूचनेनुसार तुमचे काम झालेय, चेक घ्यायला या असा निरोप धाडला. ठरल्याप्रमाणे चेक घेण्यासाठी ते आले. पाहुणचार म्हणून चहा पाजला. एवढय़ात पोलीस आले आणि त्यांना घेऊन गेले. आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला, मोठय़ा संकटातून वाचल्याने..!
एखाद्या चित्रपटातील प्रसंग वा कादंबरीतील प्रकरण नाही. हे वास्तव आहे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अनुभवलेले. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहणाऱ्या सुनील दत्ताराम गांगण या इसमाने डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या परळ शाखेत बोगस किसान विकासपत्रांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तब्बल ३० लाखांचे कर्ज काढण्यासाठी रचलेला डाव बँकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि भोईवाडा पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे अखेर गांगण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरच उलटला. त्यामुळे बनावट किसान विकासपत्राच्या माध्यमातून अनेक बँकांना गंडा घालणाऱ्या एका मोठय़ा टोळीचा पर्दापाश झाला. या प्रकरणात दोघांना अटक झाली असून बाकीचे आरोपी मात्र फरार झाले आहेत.
गांगण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डुंगे गावाच्या बाहेर पोस्ट कार्यालय उभारले होते, सर्वार्थाने नेहमीच्याच पोस्टाप्रमाणे दिसणारे हे पोस्ट ऑफिस प्रत्यक्षात मात्र बोगस होते. सर्वसाधारणपणे बँकेने दिलेल्या किसान विकासपत्रावर पोस्टात बोजा चढविल्यानंतर पुन्हा ती पोस्टामार्फत किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत आणली जातात. येथे मात्र गांगण यांनी कर्जाची तातडी असल्याचे सांगत दुसऱ्याच दिवशी ही पत्रे बँकेत आणून दिली. त्यातून बँकेच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. गांगण यांनी दिलेली प्रमाणपत्रे तपासण्यासाठी बँकेचे अधिकारी पुन्हा डुंगेच्या खऱ्या पोस्टात गेले तेव्हा आपल्याला गांगण याने दाखविलेले पोस्ट ऑफिस खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कल्याण पोस्टात चौकशी केली असता, ही किसान विकासपत्रे बनावट असल्याचे आणि अशी प्रमाणपत्रे केवळ शहरातील मुख्य पोस्टातूनच देता येत असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. त्यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी गागंण याला कसलीही कल्पना येऊ न देता भोईवाडा पोलिसांच्या मदतीने गजाआड केले. त्यामुळे बँक एका मोठय़ा फसवणुकीतून वाचली असून परेल शाखेतील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही आफत टळल्याचे बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला असता, गांगण सध्या अटकेत असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांनी मुंबईतील चेंबूर परिसरातील आणखी एका बँकेस असेच फसविल्याचा संशय असून अन्य किती बँकांना गंडा घातला आहे, याचा तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गांगण यांनी निर्माण केलेले पोस्ट कार्यालय जप्त करण्यात आले असून किसान विकासपत्र कोठे बनविली, किती जणांना फसवले तसेच त्याच्या टोळीत अजून किती जण आहेत याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
नक्की काय झाले ?
सुनील दत्ताराम गांगण या व्यक्तीने डोंबिवली बँकेच्या परळ शाखेत, किसान विकासपत्रांवर ३५ लाख रुपये तारण कर्जाची मागणी केली. त्यावर किसान विकासपत्राच्या एकूण मूल्याच्या ७० टक्के कर्ज मिळेल, त्यासाठी विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. असे बँकेतील कर्मचाऱ्यांनी गांगण यांना सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी गांगण यांनी ५० लाख रुपये मूल्याची १०० किसान विकासपत्रे सादर करून कर्जाची मागणी केली. त्यावर नियमानुसार बँकेने प्रक्रिया सुरू केली. गांगण यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची विशेषत: किसान विकासपत्रांची पडताळणी करण्यासाठी ती ज्या पोस्ट कार्यालयातून वितरित झाली त्या डुंगे पोस्ट कार्यालयात पाठविण्यात आली. बँकेचे कर्मचारीही गांगण यांच्यासमवेत ज्या डुंगे पोस्टात गेले आणि त्यांना आठ दिवसांत कर्जाचा बोजा चढवून देतो असे सांगण्यात आले ते पोस्ट कार्यालयच बनावट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
घोटाळा कसा?
सुनील दत्ताराम गांगण या व्यक्तीने डोंबिवली बँकेच्या परळ शाखेत, किसान विकासपत्रांवर ३५ लाख रुपये तारण कर्जाची मागणी केली. त्यासाठी गांगण यांनी ५० लाख रुपये मूल्याची १०० किसान खोटी विकासपत्रे सादर केली. एवढेच नव्हे तर, त्यांनी बॅंकेला दाखवायला डुंगे गावात बनावट पोस्ट ऑफिसही तयार केले.