छोटा राजनचा हस्तक लखनभय्या याची चकमक ‘बनावट’ असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब करण्याआधीच आयपीएस अधिकाऱ्यांमधील संघर्षांतून ही चकमक बनावट ठरविण्याचे जोरदार प्रयत्न झाले होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी इच्छुक असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा यामध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे. या आयपीएस अधिकाऱ्यानेच चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा हे पुन्हा पोलीस दलात येऊ नयेत, यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु या वादात नाहक १३ पोलिसांसह २१ जणांचा बळी गेल्याची चर्चा आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांत चारशे ते पाचशे चकमकी झाल्या. त्या वेळीही आयपीएस अधिकाऱ्यांच्या दोन गटातील संघर्ष वारंवार समोर आला होता.
प्रदीप शर्मा यांना अडकविण्यासाठी या चकमकीची ढाल पुढे करण्यात आली. त्यातच लखनभय्या याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता काही केल्या मागे हटण्यास तयार नव्हता. त्याचा पुरेपूर फायदा उठवीत आयपीएस अधिकाऱ्यांच्या गटाने शर्मा यांना या प्रकरणात अटक करविली. परंतु शर्मा यांच्या अटकेनंतर आणखी २२ जणही गजाआड झाले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे हे प्रकरण हातातून निसटले, अशी चर्चाही आता ऐकायला मिळत आहे. शर्मा निर्दोष सुटल्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांचा संबधित गट अस्वस्थ झाला आहे. परंतु शर्मा यांना शिक्षा ठोठावण्याच्या नादात या अंतर्गत राजकारणाशी काही संबंध नसलेल्या पोलिसांनाही शिक्षा भोगावी लागल्याचे बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा