लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: अग्निप्रतिबंध उपाययोजनांविषयीचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण पुढे करून व्यावसायिकाकडे ९० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अग्निशमन अधिकाऱ्याला माहीम पोलिसांनी अटक केली. आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
माहीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गांवरील गुलजार बेकरीच्या मालकाकडे ३० एप्रिल रोजी एक व्यक्ती आली होती. त्याने आपण अग्निशमन अधिकारी असल्याचे सांगून बेकरीचे अग्निप्रतिबंध उपाययोजनांशीसंबंधित प्रमाणपत्र आणि अग्निसुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे व्यावसायिकाला सांगितले. बेकरीच्या मालकाकडे त्याने ९० हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यासाठी ३० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असेही त्याने सांगितले. बेकरी मालकाने याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा-करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण : १० ठिकाणी ‘ईडी’चे छापे
याप्रकरणी पोलिसांनी संशयीताची ओळख पटवून एका २४ वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अग्निशमन दलाचा गणवेश हस्तगत करण्यात आला. विद्देश गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय असून आरोपी इतर बेकरी मालकांना अशाच प्रकारे गंडा घातल्याची माहीती उघडकीस आली आहे. आरोपीने बेकरी व अग्निशमनविषयक प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या इतर आस्थापनांबाबतची माहीती कुठून मिळविली, त्याचे साथीदार आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत.