मुंबई : बनावट पारपत्र व व्हिसाप्रकरणात गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. आरोपींच्या मोबाइलमध्ये ७० बनावट पारपत्र व व्हिसाची छायाचित्रे सापडली आहे. या टोळीने ८० हून अधिक लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पाठवले होते. याप्रकरणी गुन्हे गुप्तवार्ता कक्ष(सीआययू) अधिक तपास करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाच्या (एफआरआरओ) तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलिसांनी रोशन दुधवडकरला अटक करण्यात आले आहे. तो बनावट पारपत्र व व्हिसा तयार करून भारतीय नागरिकांना कॅनडा, नेदरलँड्स, तुर्की आणि पोलंडला पाठवत होता. दुधवडकर गुजरातमधील दलाल राजेश पांचाळच्या सूचनेनुसार काम करत होता. पांचाळ भारतीय नागरिकांना युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने पाठवण्याचा व्यवसाय करतो.

दुधवडकर विमानतळावर महत्त्वाची भूमिका बजावत होता. तो प्रवाशांना बनावट कागदपत्रांच्या मदतीने इमिग्रेशन क्लिअरन्स मिळवून देत होता. त्यासाठी तो स्वतः वेगळ्या विमानाचे तिकीट नोंदवायचा. मुख्य आरोपी राजेश पांचाळ प्रत्येकाकडून ३० ते ५० लाख रुपये घ्यायचा. त्या बदल्यात दुधवडकरला ५० हजार मिळायचे.

मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासणीत ८० लोकांची यादी सापडली असून त्यांनी बनावट पारपत्र आणि व्हिसावर परदेश प्रवास केला आहे. तसेच संशयास्पद कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावेही सापडले आहेत. गुन्हे शाखेने याप्रकरणी आतापर्यंत रोशन दुधवडकर (५०), अमित पुरी आणि इम्तियाज अली मोहम्मद हनीफ शेख या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या घरांवर छापे टाकून बनावट इमिग्रेशन विभागाशी संबंधीत शिक्के, खोटे पारपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३४०(२), ६१(२) तसेच पारपत्र कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण सहार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहे. आरोपी इम्तियाज अलीच्या घरी छापा टाकला. त्यावेळी अनेक बनावट इमिग्रेशन शिक्के सापडले आहेत. मात्र, त्याने अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे. पोलिसांना संशय आहे की इतरत्र अधिक बनावट कागदपत्रे लपवण्यात आली असू शकतात. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader