१३ जणांच्या अटकेनंतर वैधतेबाबत महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र परिषदेसमोर पेच
दहावी, बारावीच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे औषधनिर्माण शास्त्राची (फार्मसी) बोगस पदवी-पदविका मिळविणाऱ्या फार्मसिस्टना कसा आवर घालायचा, असा प्रश्न महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र परिषदेसमोर उभा ठाकला आहे. परराज्यातील औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) विषयातील पदवी-पदविका फार्मसिस्टची नोंदणी करणाऱ्या ‘महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र परिषदे’ला (एमएसपीसी) तपासता येते. मात्र दहावी-बारावीची प्रमाणपत्रे तपासून पदवी-पदविकाला प्रवेश देण्याची जबाबदारी त्या त्या राज्याची असल्याने ती प्रमाणपत्रे बनावट नाहीत, हे ‘एमएसपीसी’ने कसे तपासायचे असा पेच निर्माण झाला आहे.
ठाण्यामध्ये जानेवारी महिन्यात घडलेल्या बनावट फार्मासिस्ट प्रकरणानंतर हा प्रश्न समोर आला आहे. ठाण्यात पकडलेल्या चार बनावट फार्मसिस्टने दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून राजस्थानच्या महाविद्यालयांमधून डी.फार्म. केल्याचे परिषदेला दाखविले होते. आतापर्यंत परराज्यातून फार्मसी विषयात पदवी किंवा पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे दाखवून फार्मासिस्टने नोंदणी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र दहावी, बारावीची खोटी प्रमाणपत्रे देण्याचा प्रकार प्रथमच उघडकीस आला असून पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.
परराज्यातील उमेदवारांचे महाविद्यालय आणि त्या त्या राज्यातील परिषदेला उमेदवाराची माहिती पाठवून पडताळणी केली जाते. गेल्या पाच वर्षांत परिषदेने अशारीतीने फसवणूक केलेल्या ११ उमेदवारांविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. पदविका किंवा पदवीची प्रमाणपत्रे तपासण्याची जबाबदारी परिषदेची तर दहावी-बारावी प्रमाणपत्र तपासणीची जबाबदारी प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्यास संबंधित महाविद्यालयावर भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) कारवाई करणे आवश्यक आहे, असे ‘एमएसपीसी’च्या रजिस्ट्रार सायली मिसाळ यांनी सांगितले.
फार्मसीच्या महाविद्यालयांना सर्वसाधारणपणे ६० जागांची मर्यादा असते. परंतु अनेक ठिकाणी याहून अधिक जागा भरल्या जातात. अतिरिक्त जागांसाठी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा परवाना देऊ नका, असे ‘पीसीआय’कडून सांगितले जाते. परंतु विद्यार्थी नोंदणीसाठी आल्यानंतर तो अतिरिक्त प्रवेशातील आहे की नाही, हे समजणे कठीण असल्याचेही मिसाळ म्हणाल्या.
दरम्यान सर्व महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी ‘पीसीआय’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. तेव्हा ही यादी पाहण्याचे अधिकार द्यावेत, जेणेकरून आलेल्या उमेदवाराची पडताळणी करणे अधिक सोपे आणि खात्रिशीर असेल, अशी मागणी राज्य फार्मसी परिषदेने ‘पीसीआय’कडे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून परराज्यातून नोंदणी करणाऱ्या फार्मसिस्टची संख्या वाढत आहे. वर्षांला सुमारे अडीच हजार परराज्यातील फार्मसिस्ट नोंदणी करत असून एकूण अंदाजित दहा हजार फार्मसिस्टची नोंदणी राज्यात झाली आहे.
परराज्यातून पदविका प्राप्त करून नोंदणी करणारे उमेदवार योग्य दर्जाचे नसल्याची तक्रार करत यासाठी ठोस पावले उचलावीत, असे वारंवार ‘पीसीआय’ला कळविले आहे. परिषदेने यासाठी २००५ मध्ये परीक्षाही सुरू केली. मात्र काही वर्षांतच परीक्षा बंद करून कायद्यानुसार, १८ वर्षे पूर्ण, राज्यात वास्तव्य किंवा व्यवसाय आणि पदवी किंवा पदविकाचे प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीला नोंदणी करण्याचा हक्क आहे ,असे कळवीत परीक्षा घेण्यावर ‘पीसीआय’ने बंदी आणली गेली. त्यामुळे फार्मसी क्षेत्राबाबत अज्ञान असल्याचे उमेदवाराशी बोलताना लक्षात येऊनही केवळ कागदपत्रामुळे नाइलाजाने त्याची नोंदणी करावी लागत आहे. – सायली मिसाळ, रजिस्ट्रार, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र परिषद