घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया सैनिकाला घाटकोपर पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा >>>“सत्यमेव जयते”, संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुनील राऊतांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “शिवसेनेचा भगवा…”
जितेंद्र सिंह (३१) असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील मेहराना येथील रहिवासी आहे. घाटकोपर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीशी जितेंद्रने काही दिवसांपूर्वी फोनवरून संपर्क साधला. आपण सैनिक असल्याची बतावणी त्याने केली. तसेच आपले घर भाड्याने देण्यासाठी जितेंद्रने त्यांच्याकडून काही रक्कम घेतली. मात्र काही दिवसानंतर जितेंद्रने तक्रारदारांशी संपर्क साधणे बंद केले. याबाबत त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याचदरम्यान पोलिसांनी राजस्थान, मथुरा आणि नांदगाव परिसरात जितेंद्रचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. जितेंद्र उत्तर प्रदेशमधील त्याच्या गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलीस उत्तर प्रदेशमधील मेहराना येथे रवाना जाले. पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी आरोपीला अटक केली.