कारागृहात विविध गुन्ह्यात बंदिस्त असेलल्या आरोपींच्या सुटकेसाठी जामीनदाराची गरज भासते. सराईत गुन्हेगारांना जामीन देण्यासाठी सर्वसामान्य नागरिक न्यायालयाचा ससेमिरा नको म्हणून तयार होत नाही. अशा गुन्हेगारांनी आता बोगस जामीनदारांचा आधार घेतला असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने असेच एक रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. दिंडोशी आणि किल्ला कोर्ट न्यायालयात हे रॅकेट सक्रिय होते. गुन्हे शाखेने या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी संजय ओमप्रकाश शर्मा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय ओमप्रकाश शर्माला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यानंतर शर्माने जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज केला. कोर्टात शर्माच्या वतीने जामीनदार म्हणून पाच हजर झाले. या पाचही जणांनी बोगस कागदपत्रे सादर केली. पोलिसांनी कागदपत्रांची छाननी केली असता कागदपत्रे बोगस असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत सुनील नार्वेकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात संजय शर्मासह उस्मान गणी मोहम्मद उमर शेख, इम्रान मुबारक अली शेख, रशीद बब्बे हुसेन खान मोहम्मद शमशाद आणि मोहम्मद मंजूर आलम या सहा जणांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी गुन्हे शाखेने मुंबईच्या गोवंडीतून आरोपी उस्मान,इम्रान आणि रशीद याना अटक केली. तर अन्य दोन जणांचा शोध सुरु आहे.

दिंडोशी न्यायालयातही अशाच स्वरुपाची घटना समोर आली. दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी येणाऱ्या आरोपीसाठी बोगस जामीनदार येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने दिंडोशी न्यायालयात सापळा रचला. बुधवारी दुपारी दिंडोशी न्यायालयात तीन जण आले. पोलीस पथकाने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी जामीनदार राहण्यासाठी बनावट कागदपत्रेही तयार केली होती. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना बोगस दस्तावेज सापडले. संतोष पांडुरंग शिंदे, अब्दुल मदतअली शेख आणि नजीर मोहम्मद सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखा हे तिनही आरोपी यापूर्वी अन्य कुठल्याही आरोपीला बोगस जमीनदार म्हणून न्यायालयात हजार राहिले आहेत का? अशा प्रकारे अन्य कुठल्या न्यायालयाची फसवणूक केली आहे का ? याचा तपस करत आहेत.

Story img Loader