लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : बनावट व्हिसा प्रकरणात तपास करणाऱ्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) शनिवारी या प्रकरणी एका नौदल अधिकाऱ्यासह चौघांना अटक अटक केली. या टोळीने बनावट कागदपत्रांचा वापर करून व्यक्तींना दक्षिण कोरियामध्ये पाठवल्याचा आरोप आहे. संबंधीत व्यक्ती दक्षिण कोरियाला पोहोचल्यानंतर तेथील व्हिसा फाडून तेथे आश्रय घेतात व त्यानंतर तेथील नागरिकत्व घेतात. याप्रकरणातील दोघांना जम्मू काश्मिरमधून अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे.

नौदलातील सब-लेफ्टनंट ब्राहम ज्योती याला त्याची महिला मैत्रिण सिमरन तेजीसह अटक करण्यात आली आहे. ब्राहम हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी वाचा-पाच महिन्यात राज्यात १२९८ बाटल्या रक्त वाया; गतवर्षीच्या तुलनेत लाल पेशी खराब होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

याशिवाय, गुन्हे शाखेने जम्मू-काश्मीरमधून दीपक डोगरा व रवी कुमार या संशयितांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पथक त्याला मुंबईत आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिमरनने तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले असून ते खाते ब्राहमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडले आहे. कथित फसवणुकीशी संबंधित पैशांच्या व्यवहारांसाठी ब्राहम या खात्यांचा वापर करायचा. या बँक खात्यात सुमारे २५ ते ३० लाख रुपये जमा झाल्याचा दावा सूत्रांनी केला. सिमरनच्या नावावरही तीन ते चार कंपन्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने गुरुवारी लेफ्टनंट कमांडर विपिनकुमार डागर (२८) याला कुलाबा येथून अटक केली होती. तपासात आणखी एका संशयिताचे नाव उघड झाले होते. त्याच्या सांगण्यावरून आपण दक्षिण कोरिया वकिलातीमध्ये गेल्याचे डागरने सांगितले होते.

रवीकुमार याला या टोळीच्यामार्फत दक्षिण कोरियामध्ये जायचे होते. त्यांचे बनावट कागदपत्र या टोळीने तयार केले होते. त्यालाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दिपक डोगराच्या मार्फत तो या टोळीच्या संपर्कात आला होता. डोगरा गरजू व्यक्तींना शोधून दक्षिण कोरियाला जाण्यासाठी तयार करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणात परदेशात पाठवण्यात आलेले बहुतांश व नागरिक जम्मू काश्मीर परिसरातील असल्याचा संशय आहे.

आणखी वाचा-मुंबई : आशा व आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या सेवा बाधित

या टोळीतील आरोपींनी लोकांना चांगल्या कामाच्या संधी आणि चांगले पैसे मिळवण्यासाठी दक्षिण कोरियाला जाण्यास प्रवृत्त करायचे. त्यानंतर ते व्हिसाचे निकष पूर्ण करण्यासाठी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करायचे. या टोळीतील सदस्य कामासाठी दक्षिण कोरियाला जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या व्हिसा अर्जांचा तपशील डागर यांना द्यायचे. या टोळीला मदत करण्यासाठी, डागर त्याच्या अधिकृत गणवेशात दक्षिण कोरियाच्या दूतावासाला भेट द्यायचा आणि अर्जांवर जलद प्रक्रिया करण्यासाठी दबाव टाकायचा.

डागर आणि त्याच्या साथीदारांनी ८ ते १० लोकांना फसवणूक करून दक्षिण कोरियाला जाण्यास मदत केली आणि त्यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये वसूल केले.गुन्हे शाखेने त्याची पार्श्वभूमी तपासली असता डागर हरियाणातील सोनीपत येथील असल्याचे त्यांना आढळले. सुमारे सहा वर्षांपूर्वी ते नौदलात रुजू झाले आणि गेल्या एक वर्षापासून ते पश्चिम नौदल कमांडमध्ये कार्यरत आहेत.