मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करून इच्छुक अर्जदारांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीची इत्थंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावर देण्यात आली असून महत्त्वाचे म्हणजे अर्जाची अनामत रक्कम या संकेतस्थळावरून अदा करून घेतली जात आहे. या प्रकरणाची प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
म्हाडाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस होत नाहीत तोच म्हाडाचे संकेतस्थळ संथगतीने सुरू असल्याने इच्छुक अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात आता म्हाडाच्या सोडतीच्या संकेतस्थळाचे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून अर्ज भरून घेतले जात आहेत. इतकेच नव्हे तर अर्जाबरोबर आता अनामत रक्कमही भरून घेण्यात येत आहे. याबाबत मुंबई मंडळाकडे एक तक्रार आल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच इच्छुकांनी अर्ज आणि अनामत रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर mhada.org हे बनावट संकेतस्थळ असून अशा वा इतर संकेत स्थळावर अर्ज भरू नये, अनामत रक्कमही अदा करू नये असेही आवाहन म्हाडाने केले आहे.