मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसणूक केली जात आहेत. सायबर फसवणूक करण्यासाठी बनावट लिंकची निर्मिती केल्याचे निदर्शनास आले होते. पण आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे.
उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे आली होती. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी ५ मार्चला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण सायबर फसणूक करणाऱ्या भामट्यांनी आता थेट सरकारी संकेतस्थळाप्रमाणे बनावट संकेतस्थळ बनवले आहे. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ नावानेच बनावट संकेतस्थळ करण्यात आले आहे. त्याद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्याची निर्मिती राजस्थानमधून असल्याचे सायबर तज्ज्ञांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे.
सहा बनावट लिंक
सायबर फसणूक करणाऱ्यांनी रोस्मर्टा आणि रियल मॅझॉन यांची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बनावण्यासाठी बनावट नोंदणी लिंक तयार केली आहे. याबाबत कंपनीकडून परिवहन विभागाला कळवण्यात आले आहे.
या फसवणूक करणाऱ्यांनी वाहनमालकांकडून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, परिवहन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सहा बनावट लिंक तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
राजस्थानातून निर्मिती
डोमेन स्पुफिंग करून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत असल्यामुळे सर्च इंजिनवरही ही बनावट संकेतस्थळे दिसतात. या बनावट संकेतस्थळांची निर्मिती राजस्थानमधून झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
boookmyhsrp. com हे फसवणूक करणारी संकेतस्थळ अधिकृत एचएसआरपी नोंदणी बुकिंग पोर्टल्सप्रमाणे बनवण्यात आले आहे. हा डोमेन स्पूफिंगचा प्रकार आहे. त्यात ‘’ book’’ या शब्दात एक अतिरिक्त ‘’ o’’ हे अक्षर वाढवून संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सर्च इंजिनवरही बनावट संकेतस्थळ सूचीबद्ध आहे आणि आर्टिफिशिअर इंटेलिजन्स निर्मित शोध परिणामांमध्ये दिसून येते. त्यामुळे नागरिकांना ती अधिकृत सरकारी संकेतस्थळ असल्याचा गैरसमज होतो. हे संकेतस्थळ एचएसआरपी पाट्यांच्या नोंदणीच्या नावाखाली वैयक्तिक वाहन तपशील, वापरकर्त्याची माहिती आणि पेमेंट डेटा गोळा करते. या संकेतस्थळावर भरण्यात आलेली रक्कम अधिकृत एचएसआरपी नोंदणीसाठी जात नाहीत, परिणामी फसवणूक झालेल्यांना एचएसआरपी प्लेट मिळत नाही किंवा त्यांना परतावाही दिला जात नाहीे. काही नागरिकांनी संकेतस्थळावरून आर्थिक माहितीही गहाळ झाली आहे. या फसवणुकीतून नागरिकांचे एक ते दीड हजार रुपये जात अल्यामुळे अनेकजण तक्रार करण्यासाठी पुढेही येत नाहीत, अशी माहिती सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आली.