नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदीच्या सुरुवातीला आकर्षण आणि कुतुहलाचा विषय ठरलेले ऑनलाइन शिक्षण मुलांसह पालकांसाठीही अधिकाधिक त्रासदायक ठरत आहे. तंत्रस्नेही नसलेल्या मुलांसोबत स्क्रीनसमोर बसणे, गृहपाठ कागदावर लिहून घेणे आणि त्यांना घरातल्या वातावरणात एकाग्र ठेवण्यासाठी वेगवेगळे सायास करून पालक जेरीस आले असून कनिष्ठ मध्यमवर्गात अत्यावश्यक साधने आणि इंटरनेटचा अभाव असल्याने त्या घरांतील शिक्षण पूर्णपणे थांबले आहे. मात्र, तरीही शाळांचा ऑनलाइन शिक्षणाचा हट्ट कायम आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, स्मार्टफोन, इंटरनेट या सुविधा असणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे ही उपकरणे नाहीत, त्यांनी नवी उपकरणे विकत घेणे शाळांना अपेक्षित आहे. मात्र ही अपेक्षा ठेवताना पालकांच्या आर्थिक स्थितीचा कोणताही विचार केला जात नाही. आधीच टाळेबंदीमुळे पालकांचे उत्पन्न कमी झालेले असताना अनेक पालकांना ऑनलाइन शिक्षणासाठीचा वाढीव खर्च झेपणारा नाही, अशी परिस्थिती आहे.

‘एक दिवस मुलाला शाळेत आणायला गेले असताना त्याच्या हातात दिलेला भ्रमणध्वनी शाळेने काढून घेतला. एका बाजूला अशी शिस्त असताना आता शाळाच मुलांना तंत्रज्ञानाच्या आहारी जायला भाग पाडत आहे’, असे एका पालकाने सांगितले. याबाबत पालकांनी ऑनलाइन शिक्षण गैरसोयीचे असल्याचे संदेश व्हॉट्सअ‍ॅप समूहावर पाठवले. त्यावर काहीही प्रतिसाद न देता शाळेने समूहाची सेटिंग ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ करून पालकांचा तक्रार करण्याचा अधिकार  काढून घेतला. तक्रारींना वैतागून शाळेने मुलांना काढून टाकल्यास लगेच दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार नाही या भीतीने बरेच पालक गप्प आहेत. आठवीपर्यंत उत्तीर्णच करायचे असेल तर शाळा सुरू करण्याची घाई कशासाठी, असे पालकांचे म्हणणे आहे.

‘सगळे सुरळीत झाल्यावरच शाळा सुरू करावी. दिवाळीची सुट्टी २१ दिवसांऐवजी ४ दिवसच देऊन राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा’, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. शाळा पालकांकडून अनुमती पत्र भरून मागत आहे आणि पालक-शिक्षक संघाचे काही सदस्य अनुमती देण्यासाठी इतर पालकांवर दबाव टाकत आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना तर, शाळा आणि खासगी शिकवण्यांच्या ऑनलाइन वर्गाना हजेरी लावण्यासाठी पुढचे काही महिने तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

डोळे, कानांवर परिणाम..

लहान मुलांना लॅपटॉप हाताळता येत नाही. नोकरी करणारे पालक भ्रमणध्वनी घरी ठेवत नाहीत. त्यामुळे मुलांना ऑनलाइन वर्गात सहभागी होता येणार नाही. ऑनलाइन वर्गाना दांडी मारण्याचीही सोय नाही, कारण याचे गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य़ असतील. विद्यार्थ्यांनी कानात इअरफोन्स घालणे अनिवार्य असल्याने ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम मुलांच्या डोळ्यांसह कानांवरही होण्याची भीती आहे.

पाल्यांची अडचण..

मालाडच्या एका कॉन्व्हेंट शाळेचे पहिली-दुसरीचे वर्ग दुपारी १२ वाजता आणि तिसरी-चौथीचे वर्ग दुपारी ४ वाजता ऑनलाइन भरणार आहेत. एकाच घरात पहिली-दुसरी दोन्ही इयत्तांतील मुले असतील तर दोघांनाही एकाच वेळी लॅपटॉप मिळू शकत नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट या सुविधाच नाहीत. घरात लहान भावंड असेल तर ते मोठय़ा भावा-बहिणीच्या ऑनलाइन शिक्षणामध्ये व्यत्यय आणते. घराच्या परिसरात इतर मुले खेळत असल्याने  सतत गोंधळ असतो.

पालकांचे निरीक्षण..

ऑनलाइन शिक्षणामध्ये मुलांना नीट आकलन होत नाही. ऑनलाइन वर्ग संपल्यानंतर गृहपाठ पीडीएफद्वारे पाठवला जातो. लहान मुलांना पीडीएफ हाताळता येत नसल्याने पालकांना गृहपाठ कागदावर उतरवून घ्यावा लागतो. मुलांसह पालकांसाठीही ऑनलाइन शिक्षण कंटाळवाणे आहे.