मुंब्रावासीयांना ठाणे देऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला ठेंगा दाखवत बुधवारी महापालिका प्रशासनाने ठाणे शहरासह मुंब्रा भागातील सहा अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या ८७ कुटुंबांना वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांमध्ये स्थलांतरित केले. महापालिकेचे नवे आयुक्त असीम गुप्ता यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेत कमालीची अस्वस्थता व्यक्त होत आहे.
शहरातील उर्वरित अतिधोकादायक इमारतींवर अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याचे बेत महापालिकेने आखले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  मुंब्रा परिसरातील सुमारे एक हजार कुटुंबांचे स्थलांतर वर्तकनगरमध्ये करण्याऐवजी कौसा येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरांमध्ये करावे, अशी जाहीर भूमिका सत्ताधारी शिवसेनेने घेतली होती. पुनर्वसनाच्या या मुद्दय़ाला जातीय राजकारणाचा रंग चढू लागल्याने ठाण्यातील वातावरण तापले होते. मात्र, आयुक्त गुप्ता यांच्या या कारवाईमुळे आता या मुद्दय़ाला एकप्रकारे चाप बसला असून शिवसेनेलाही एकप्रकारे धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Story img Loader