प्रशासनाचे दुर्लक्ष; रहिवाशांची नाराजी

समीर कर्णुक

मुंबई : चुनाभट्टीतील ४५ गिरणी कामगार कुटुंबीय गेल्या १५ वर्षांपासून धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असून अत्यंत जीर्ण झालेली ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरा पर्यायच नसल्याने जीव मुठीत धरून हे कुटुंबीय या ठिकाणी राहत आहेत. आमचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत.

‘स्वदेशी मिल’मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६०मध्ये चुनाभट्टी परिसरात टाटा नगर नावाची तीन मजल्याची इमारत बांधण्यात आली. त्या वेळी या इमारतीमध्ये १२२ कुटुंब राहत होते. मात्र २००१ला गिरणी बंद झाल्याने कंपनीने या इमारतीकडेही दुर्लक्ष केले. काही वर्षांपूर्वीच या इमारतीची दयनीय अवस्था झाली होती. ज्या रहिवाशांकडे पैसे होते, त्यांनी इतर ठिकाणी आपला संसार थाटला. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असलेली ४५ कुटुंबे अद्यप याच इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत.  या इमारतीची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली असून इमारतीचे खांब, छत, खिडक्या, दरवाजे पूर्णपणे निकामी झाले आहेत. मात्र दुसरा पर्यायच नसल्याने कोणी छतावर प्लास्टिक घालत आहेत, तर कोणी पडणाऱ्या छताला तात्पुरते सिमेंट लिंपून डागडुजी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांची हीच अवस्था आहे. पावसाळा जवळ येताच या रहिवाशांच्या छातीत धडधड सुरू होते. इमारत कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे जास्त वारा आणि पाऊस सुरू झाल्यास संपूर्ण रात्र जागून काढावी लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

पालिकेकडून दरवर्षी केवळ नोटीस

महापलिकेने १५ वर्षांपूर्वी या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर दरवर्षी पावसाळा सुरू होताच पालिकेकडून इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस लावली जाते. मात्र पालिकेकडून रहिवाशांसाठी कुठेही राहण्याची सोय केली जात नाही. पालिका आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इमारतीला झाडांचा विळखा

योग्य डागडुजी आणि साफसफाई नसल्याने इमारतीच्या सर्वच मजल्यांवर पिंपळाची झाडे उगवली आहेत. या झाडांची मुळे इमारतीच्या भिंतीमध्ये गेल्याने इमारत अधिकच पोकळ झाली आहे. पालिकेने निदान ही झाडे तरी कापावी अशी विनंती अनेकदा आम्ही केली आहे. मात्र त्याकडेही कोणी लक्ष देत नसल्याचे एका स्थानिकाने सांगितले.

Story img Loader