मुंबई: प्रसिद्ध महिला क्रिकेटरच्या आईची सायबर फसवणूक झाल्याप्रकरणी सध्या माहीम पोलीस तपास करत आहेत. पतीकडून घेतलेली कर्जाची रक्कम परत करण्याच्या बहाण्याने आरोपीने तक्रारदार महिलेची एक लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. तक्रारदार महिला (५४) माहीम पश्चिम येथे राहतात.
हेही वाचा >>> चिंतन उपाध्यायला उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच; हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार
अमित कुमार नावाच्या व्यक्तीचा ९ डिसेंबरला त्यांना दूरध्वनी आला होता. तुमच्या पतीने मला १५ हजार रुपये कर्ज दिले होते. त्याबाबत त्यांच्याशी बोलणे झाले होते. त्यावेळी तुमच्या पतीने मला तुमच्या मोबाईलवर गुगलपेद्वारे रक्कम पाठवण्यास सांगितली आहे. असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार महिलेला सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांच्या बँक खात्यात १० व ५० हजार रुपये जमा झाल्याचे दोन संदेश आले. पुढे. अमित कुमारने तक्रारदार महिलेला पुन्हा दूरध्वनी करून तुमच्या खात्यावर ५० हजार रुपये चुकून जमा झाले आहेत. ते माझ्या बँक खात्यात पुन्हा पाठवा, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने ५० हजार रुपये अमित कुमार याला पाठवण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम हस्तांतरीत झाली नाही.
अखेर अमित कुमार याने बोलण्यात गुंतवून विविध मोबाईल क्रमांकांवर सुमारे एक लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. तक्रारदार महिलेला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीसाठी आरोपीने पाच मोबाईल क्रमांकाचा वापर केला आहे. त्यांची माहिती घेऊन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.