प्रशांत ननावरे

सविता सवनाल या मूळच्या कर्नाटकातल्या. पूर्वीपासूनच त्यांना जेवण बनवण्याची आणि लोकांना खाऊ  घालण्याची आवड होती. लग्नानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप दिलं. आपल्या वहिनीसोबत २००३ पासून त्या लहानमोठे समारंभ आणि कंपन्यांसाठी कॅटरिंगच्या ऑर्डर घ्यायच्या. पुढे लोकांना आपले पदार्थ आवडतायत हे लक्षात आल्यावर पती अशोक यांच्या मदतीने त्यांनी २००६ साली  लोखंडवाला टाऊनशीपमध्ये ‘अ टेस्ट ऑफ इंडिया’ हे छोटं हॉटेल सुरू केलं. त्या वेळी ठाकूर व्हिलेजमध्ये एकही नॉनव्हेज रेस्टॉरंट नव्हतं. त्यामुळे अल्पावधीतच हॉटेलची कीर्ती सर्वदूर पसरली. आज गेली बारा वर्षे हे छोटेखानी रेस्टॉरंट ठाकूरवासीयांच्या सेवेत आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांत तंदूर, चायनीज, कर्नाटकी, मालवणी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ येथे सव्‍‌र्ह केले जातात.

‘अ टेस्ट ऑफ इंडिया’च्या वेगळेपणाची सुरुवात मेन्यूपासूनच होते. रंगीबेरंगी मेन्यूमध्ये डाव्या बाजूला पदार्थाची नावं आणि उजव्या कोपऱ्यात किमती या संकल्पनेला फाटा देण्यात आलाय. पानाच्या मध्यभागी मोठ्या अक्षरात सुररर के पियो, चल शुरू होजा, रायता फैल गया, सब का बाप, चक्की पिसिंग, दाल में कुछ काला, क्या भात है, देसी चायनिज, मेड फॉर इज अदर सिटी बजाके, एकदम झकास, कुछ मिठा हो जाए, मिली भगत अशी शीर्षके देऊन त्या खाली पदार्थाची नावं आणि तो कसा तयार होतो, त्यातील घटक पदार्थ कोणते याची कंसात थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्यामुळे पदार्थाची ऑर्डर देताना आपल्या पुढ्यात नेमकं काय येणार आहे याची थोडीफार पूर्वकल्पना असते.

अतिशय चांगल्या प्रतीच्या कोंबडीचं, प्रमाणात मसाला लावलेलं आणि व्यवस्थित शिजवलेलं तंदूरी चिकन आवर्जून खाण्यासारखं आहे. दही घातलेल्या हिरव्या चटणीसोबत ते सव्‍‌र्ह केलं जातं. सूपमध्ये फार कमी ठिकाणी मिळणारा शोर्बा नावाचा प्रकार इथे आहे. त्यात टोमॅटो, मशरूम आणि चिकन असे तीन प्रकार आहेत. विशेष म्हणजे त्यात क्रिमचा मस्तपणे वापर करण्यात आलाय. त्यामुळे शोर्बाला एक वेगळाच फ्लेवर प्राप्त  होतो. साऊथ इंडियन पदार्थ ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी खास रसमसुद्धा मिळतं. मऊ, लुसलुशीत आणि ताज्या पनीरमुळे पनीरच्या भाज्या अधिक चविष्ट लागतात. शिवाय वेगवेगळे मसाले आणि पद्धतीने तयार केलेला कोफ्ता, मशरूम, चना मसाला व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. नॉनव्हेजमध्ये चिकन, मटण आणि मासे असे तीनही पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी चिकन मुख्यत: नॉर्थ इंडियन पद्धतीने, मटण साऊथ इंडियन पद्धतीने आणि मासे कारवारी, कोंकणी पद्धतीने तयार केले जातात.

रोटी खाऊन झाल्यावर बिर्याणीवरही ताव मारायला हरकत नाही. सर्वच प्रकारच्या बिर्याणी तुम्हाला येथे चाखायला मिळतील. त्यासाठी चांगल्या प्रतिचा बासमती तांदूळ वापरला जातो.

स्पेशल मेन्यूमध्ये तव्यावर तळलेले मासे, कोलंबी आणि मशरूम गस्सी, आमशे तिकशे बांगडा हा खास कारवारी पद्धतीने तयार केलेला मासा, राजस्थानी लाल मांस यांसारखे वेगळे पदार्थ आहेत. पदार्थ चवदार आहेतच पण त्यांची क्वाँटिटीदेखील चांगली आहे. कुठलीही एखादी ग्रेव्ही किवा राईस दोन माणसांना पोटभर होतो. त्यामुळेच एक माणसासाठीही खास मेन्यू आहे. त्यामध्ये खिचडी कढी पापड, खिमा पाव, अंडा करी पाव आणि व्हेज, नॉनव्हेज थाळी मिळते.

हॉटेलमध्ये प्रवेश करताच समोरच्या बोर्डावर त्या दिवशीच्या स्पेशल पदार्थाची यादी असते. ती पाहून मगच पदार्थ ऑर्डर करण्यात शहाणपणा आहे. ‘कीर्ती लहान मूर्ती महान’ असा काहीसा या हॉटेलचा थाट आहे. योग्य किमतीत चांगल्या दर्जाच्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर इथे भेट द्यायलाच हवी.

‘अ टेस्ट ऑफ इंडिया’

’ कुठे- ३४, सेंट्रीयम, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४०० १०१

’ कधी- सोमवार ते रविवार सकाळी ११.३० ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत.

@nprashant

nanawareprashant@gmail.com