लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा यांचे ‘प्रकृती’ नावाचे चित्र बेलार्ड पिअर येथील ऑक्शन हाऊसच्या गोदामातून चोरीला गेल्याची तक्रार माता रमाबाई आंबेडकर (एमआयए) मार्ग पोलिसांकडे करण्यात आली असून त्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रझा यांनी १९९२ मध्ये हे चित्र काढले होते. त्याची किंमत अडीच कोटी रुपयांहून अधिक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बेलार्ड पिअर येथील एका ऑक्शन हाऊस यांच्या गोदामात ठेवलेले एस. एच. रझा यांचे ‘प्रकृती’ नावाचे चित्र चोरीला गेले असून हे चित्र लिलावासाठी तेथे आणण्यात आले होते. हे चित्र २४ मार्च, २०२२ ते ३० मे, २०२४ दरम्यान चोरीला गेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. सिद्धांत शेट्टी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी एमआरए मार्ग पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात भारतीय दंड विधान ३८० अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हे चित्र ४७.२ इंच लांब व १५.७ इंच रुंद असून रझा यांनी १९९२ मध्ये ते रेखाटले होते. ‘प्रकृती’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या चित्रांची किंमत अडीच कोटी रुपये आहे. याप्रकरणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd