रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा आज मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाला क्रिडापटू, आंतरराष्ट्रीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी करण्यात आलेली रोषणाई आणि दिग्गज मंडळीच्या उपस्थितीमुळे सर्व परिसर उजळून निघाला होता.
संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख बॅन की मून, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक महत्वाच्या मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वतः मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता या जातीने हजर होत्या. यावेळी लग्नस्थळाला करण्यात आलेली सजावट व रोषणाई प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती. फुलांपासून बनवण्यात आलेली भगवान श्रीकृष्णाची सुरेख मुर्ती, मोर, घोडे, हत्ती यांच्यामुळे या सोहळ्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली.
बॉलिवूडमधली प्रसिद्ध संगीतकार विशाल-शेखर यांचा एक खास कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. 10 आणि 11 मार्चला खास रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी अंबानी परिवाराने अनेक समाजउपयोगी कार्यक्रमही आयोजित केले होते. यामध्ये 2 हजार अनाथ मुलांना स्वतः अंबानी परिवाराने स्वतःच्या हाताने जेवण वाढलं. याचवेळी मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलिसांसाठीही अंबानी परिवारातर्फे विशेष मिठाई पाठवण्यात आली होती.