क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज ४५वा वाढदिवस आहे. त्याने आता ४६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सचिनने आपल्या कुटुंबासमवेत सोमवारी मध्यरात्री वाढदिवस साजरा केला. दरम्यान, सचिनच्या मुंबईतील घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी या चाहत्यांनी देखील सचिनच्या प्रतिमेसमोर केक कापून आपल्या लाडक्या खेळाडूचा वाढदिवस साजरा केला.


सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला असून त्याचा आज ४५वा वाढदिवस असून तो आता ४६व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मुंबईत जन्मलेला सचिन जुन्या पिढीतील अनेक दिग्गजांबरोबर तसेच नव्या पिढीतील खेळाडूंबरोबर खेळला आहे. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासूनच सचिनच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आज दिवसभर त्याच्यावर वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि प्रेमाचा वर्षाव होणार आहे. दिवसभरात क्रिकेट विश्वातील तसेच चाहत्यांकडून विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर सचिनच्या वाढदिवसानिमित्त विविध माध्यमांतून त्याचीच चर्चा सुरु असेल.

सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर २०० कसोटी सामने आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळला आहे. ही बाब कोणत्याही खेळाडूसाठी सोपी नाही. मात्र, सचिन स्वतः सांगतो की त्याचे विक्रम केवळ गौतम गंभीर किंवा विराट कोहली हे दोन खेळाडूच तोडू शकतात किंवा तिथपर्यंत पोहोचू शकतात.

सचिन तेंडूलकरबद्दल काही गोष्टी

  • सचिन तेंडूलकरने २०० कसोटी सामन्यांत ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने इतिहास रचला आहे.
  • ४५ वर्षीय सचिनला परफ्यूम आणि घड्याळं जमवणे याचा छंद आहे.
  • कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे.
  • सचिन तेंडूलकरकडून आज आपला वाढदिवस विशेष बनवण्यासाठी आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट देण्याची योजना आखल्याचे कळते.
  • सचिन तेंडूलकर क्रिकेटच्या इतिहासातील असा फलंदाज आहे, ज्याने १०० शतके लगावली आहेत, अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
  • सचिन तेंडूलकर सध्या राज्यसभेत खासदार आहे. त्याने देशातील काही गावांना दत्तक घेतले असून त्यांच्या विकासात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे.

Story img Loader