मुंबईचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष रा. ता. कदम यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि तीन कन्या असा परिवार आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून ते प्रसिद्ध होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर कदम यांनी कॉंग्रेस (आय)या पक्ष सोडून शरद पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला.
१९७० ते १९९६ इतका दीर्घकाळ ते टिळकनगर, पेस्तमसागर, चेंबूर या प्रभागाचे नगरसेवक होते. १९९३ मध्ये त्यांनी बृहन्मुंबई महापालिकेचे महापौरपद भुषविले. दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केलेल्या कदम यांनी महापालिकेतही अन्य विविध समित्यांवर काम पाहिले होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते संयमी आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात होते.
कदम यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे महापौर निधीत एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. महापौर निधीत इतक्या मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत मिळवून देणारे ते पहिलेच महापौर ठरले. महापौर म्हणून कदम यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या आणि प्रभागातील प्रश्न जाणून घेतले. कदम यांनी काही काळ एका वृत्तपत्रातही नोकरी केली होती. मात्र त्यानंतर ते राजकारण आणि सामाजिक कार्याकडे वळले. टिळकनगर हौसिंग फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. टिळकनगर, चेंबूर परिसरात त्यांनी ‘आपली शाळा’ ही शाळाही उभारली.
शनिवारी सायंकाळी घाटकोपर येथील स्मशानभूमीत कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, माजी महापौर चंद्रकांत हंडोरे, माजी नगरसेवक राजा चौगुले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईचे माजी महापौर कदम यांचे निधन
मुंबईचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष रा. ता. कदम यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि तीन कन्या असा परिवार आहे.
आणखी वाचा
First published on: 09-12-2012 at 02:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer mumbai mayer kadam dead