शेतकरी माधव कदम आत्महत्या प्रकरणी विरोधकांकडून सरकार धारेवर
नांदेड येथील माधव कदम या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत. मात्र, सत्ताधारी आमदाराच्या स्वीय सहायकास जमीन नसतानाही सव्वा लाखांची मदत कशी देण्यात आली, असा सवाल करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावत या शेतकऱ्याला सर्व प्रकारची मदत देण्यात आल्याचा दावा केला.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून नांदेड येथील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित केला. नुकसानीपोटी सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कम अर्धवट देण्यात आली. मतदीसाठी मंत्रालयापर्यंत येऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. या प्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंडे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, मग सत्ताधारी आमदाराच्या स्वीय सहायकास जमीन नसतानाही सव्वा लाखाचे अनुदान कसे मिळाले, असा सवाल करीत मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. त्याला काँग्रेसचे शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील आदींनी पाठिंबा दिला.
मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. या शेतकऱ्यास झालेल्या नुकसानीपोटी ४ हजार ६२४ रुपयांची मदत देण्यात आली होती. मात्र, ही मदत कमी असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यानंतर कापसाचे अनुदान अजून द्यायचे असून ते लवकरच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यानी त्यांच्या निदर्शनास आणले होते. तसेच अन्न सुरक्षा योजनेसह त्यांना सर्व प्रकारचे लाभ देण्यात आले होते. कदम यांनी यापूर्वीही १८ डिसेंबर रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती खडसे यांनी सभागृहात दिली.

Story img Loader