मुंबई : रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली. हिवाळ्यातील अनुकूल हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली. दिल्ली आणि कोलकाता या देशातील मोठ्या बाजारांतून मागणी घटल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो पाच ते आठ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.राज्यात रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त लागवडी झाल्या.

जानेवारीअखेर राज्यात १३ हजार ५९५ हेक्टरवर टोमॅटो लागवड करण्यात आली आहे. पुण्यात सर्वाधिक ४,८११ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ४,०४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट, अति थंडी सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला नाही. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे.

देशात दिल्ली आणि कोलकाता टोमॅटोच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. सध्या दिल्लीला पंजाब, हिमाचल प्रदेशातून तर कोलकात्याला ईशान्येकडील राज्यांतून टोमॅटोचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे दिल्ली, कोलकात्यातून असणारी मागणी घटली आहे. दक्षिणेतही स्थानिक गरज स्थानिक पातळीवरच भागते आहे. त्यामुळे टोमॅटोच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

तापमान वाढीमुळे मे, जूनमध्ये दरवाढ

पुणे, छत्रपती संभाजीनगर विभाग टोमॅटो उत्पादनात आघाडीवर आहे. गत पंधरा दिवसांपासून राज्यातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्याचा फटका बसून टोमॅटो पक्व होण्याचा काळ दहा दिवसांनी कमी झाला आहे. टोमॅटो वेगाने पक्व होऊ लागल्यामुळे बाजारातील आवक गत पंधरावड्यात वाढली आहे. एकीकडे मागणी घटली आहे, दुसरीकडे आवक वाढल्यामुळे दरात पडझड झाली आहे. तापमान वाढीमुळे टोमॅटो लागवडीवर आणि रोपांच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीचा परिणाम मे आणि जून महिन्यांत जास्त जाणवेल. उत्पादनात घट होऊन मे, जूनमध्ये दरवाढ होण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी राज्यात मिळालेला दर

राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. गुरुवारी अकलूजमध्ये २३ क्विंटल आवक होऊन सरासरी दहा रुपये, कोल्हापूरमध्ये २८९ क्विंटल आवक होऊन सरासरी सात रुपये, सोलापुरात १६९ क्विंटल आवक होऊन सरासरी चार रुपये, नगरमध्ये ४१४ क्विंटल आवक होऊन सरासरी नऊ रुपये, जळगावात ६५ क्विंटल आवक होऊन सरासरी पाच रुपये, पुण्यात २२९० क्विंटल आवक होऊन सरासरी नऊ रुपये, नागपुरात सरासरी ४०० क्विंटल आवक होऊन सरासरी ६ रुपये आणि मुंबईत २०५९ क्विंटल आवक होऊन सरासरी १२ रुपये दर मिळाला.

दीड महिन्यांपासून पडझड

तापमान वाढीमुळे दहा दिवसांनंतर पक्व होणारा टोमॅटो आताच तोडणीला आला आहे. देशभरातून मागणी घटली आहे, आवक वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गत दीड महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात पडझड झाली आहे, अशी माहिती अहिल्यानगर येथील टोमॅटो उत्पादक गणेश नाझरीकर यांनी दिली.

Story img Loader