शेतकरी, वारकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आदींना एकाच व्यासपीठावर आणून विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गाव-खेडय़ांचा विकास साधण्यासाठी भारतीय विकास संगम या संस्थेतर्फे कोल्हापूरमध्ये १८ ते २५ जानेवारी या कालावधीत भारतीय संस्कृत उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कृषि उत्सव, वारकरी उत्सव, युवा ज्ञानोत्सव, आरोग्य उत्सव, मंगलोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्त्र मंडळी त्यात सहभागी होणार आहेत.
‘माझा गाव, माझा जिल्हा, माझा देश, माझे विश्व’ या अनुशंगाने स्वावलंबी, स्वाभिमानी परिवार व ग्रामनिर्मिती आणि निसर्गाधारित राष्ट्र विकासाच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर नगरीमध्ये १८ जानेवारी रोजी सायंकाळी शोभायात्रेने या उत्सवाला सुरुवात होणार असून १९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरंभ उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार असून मुख्य अतिथी म्हणून ग्रामविकास मंत्री वीरेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत. २० जानेवारीपासून २५ जानेवारीपर्यंत विविध उत्सव भरवण्यात येतील. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवांच्या सांगता सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार महाराज श्री करणसिंह उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापुरमधील करवीर तालुक्यातील कणेरी गावातील सिद्धगिरी मठामध्ये या उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुमारे १०० एकर जागेमध्ये होणाऱ्या या उत्सवात दररोज सकाळी बाबा रामदेव महाराज यांच्या योगासनांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्त्र, निष्णात डॉक्टर, अभियंते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या उत्सवात सहभागी होणार आहेत. ३५ हजार जणांच्या निवासाची तसेच दररोज दीड लाख लोकांच्या विनाशुल्क भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. सह्य़ाद्रीतून नष्ट झालेल्या वनौंषधींचे पार्कचे दर्शनही या निमित्ताने घडेल, अशी माहिती काढसिद्धेश्वर महाराजांनी दिली.
*१८ जानेवारी: शोभायात्रा
*१९ जाने.: उत्सवाचे उद्घाटन.
*२० जाने. : कृषी उत्सव
*२१ जाने. : वारकरी उत्सव
*२२ जाने. : युवा ज्ञानोत्सव
*२३ जाने. : मातृशक्ती उत्सव
*२४ जाने. : आरोग्य उत्सव
*२५ जाने. : मंगलोत्सव