अधिक उत्पादन वा वेगळे पीक घेण्याचे शेतीमधील अभिनव प्रयोग हे बांधाच्या आतच राहू नयेत यासाठी काय करता येईल? कोरडवाहू शेतीसाठी पावसाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्याची युक्ती काय? आणि बडय़ा उद्योगसमूहांचे शेतीकडे वळलेले लक्ष आणि वायदेबाजार, कंत्राटीशेतीच्या नव्या आव्हानांना सामान्य शेतकरी पेलू शकेल काय? त्याचा निभाव लागण्यासाठी शेतीचे अर्थकारण कसे असेल आणि शेतीक्षेत्राच्या वाटचालीची दिशा काय असेल या प्रश्नांची चर्चा ‘लोकसत्ता’तर्फे पुण्यात होत असलेल्या ‘शेती आणि प्रगती’ या चर्चासत्रात २५ फेब्रुवारी रोजी होईल.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात २४ आणि २५ फेब्रुवारीला ‘शेती आणि प्रगती’ या विषयावर पुण्यात दोन दिवसीय चर्चासत्र होत आहे. कोरेगाव पार्क येथील ‘व्हिवांता बाय ताज ब्लू डायमंड’ येथे हे चर्चासत्र पार पडणार आहे.
मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशी ‘शेतीमधील अभिनव प्रयोग’ या सत्राने चर्चासत्राची सुरुवात होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी प्रयोग करत आहेत. आपल्या शेताच्या एखाद्या तुकडय़ापुरते हे मर्यादित नाही. शेती व शेतकऱ्याची स्थिती बदलणाऱ्या नव्या प्रयोगांची चर्चा या सत्रात होईल. संजय देशमुख, डॉ. ज्ञानदेव हापसे, एन. बी. म्हेत्रे, डॉ. दत्तात्रय वणे हे प्रयोगशील शेतकरी आपल्या प्रयोगांची कथा सांगतील.
‘शेती व पाणी’ या दुसऱ्या सत्रात राहुरी कृषीविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, अरुण देशपांडे, दि. मा. मोरे पाणीवापराच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतील. महाराष्ट्रातील शेती व तिला मिळणारे अपुरे पाणी हा कायमच चर्चेचा विषय. बहुसंख्य शेती कोरडवाहू असल्याने पावसावर अवलबून तर बागायती शेतीत पाण्याचा बेफाम वापर. पाण्याच्या प्रश्नावरून आता जिल्ह्य़ांजिल्ह्य़ांमध्ये वाद निर्माण होत आहे, या सर्व मुद्दय़ांचा विचार या सत्रात होईल.
याचा समारोप ‘शेतीचे अर्थकारण व भवितव्य’ या विषयावरील चर्चेने होईल. शेतीक्षेत्रातील वायदेबाजारासह कंत्राटी शेती, शेतीचे कंपनीकरण, सहकारी शेती अशा शेतीच्या भवितव्याशी निगडीत मुद्दय़ांची चर्चा या सत्रात होईल. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील, मिलिंद मुरूगकर, निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी भवितव्याची दिशा दाखवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा