अडकलेला कामगार वर्ग दिवसेंदिवस नैराश्येच्या गर्तेत; व्यवसाय सुरळीत होण्यासाठी अजून तीन ते चार महिने प्रतीक्षा

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : कच्च्या मालाचा तुटवडा, कामगारांची कमतरता, प्रवास, सुरक्षेचा प्रश्न अशा अनंत अडचणींतून पुन्हा सावरणे हलवाई, फरसाण व्यावसायिकांना कठीण जाणार आहे.

मधल्या काळात या व्यावसायिकांना सरकारने टाळेबंदीतून वगळले. परंतु, अनेक अडचणींमुळे मुंबई-ठाण्यातील दुकाने बंदच आहेत. आता राज्य सरकारनेही घूमजाव के ल्याने ही दुकाने बंदच राहणार आहेत. अर्थात टाळेबंदी उठल्यानंतर उद्योग पुन्हा सुरू करणे कठीणच जाणार आहे, असे सांगत लालबागमधील ‘लाडू सम्राट’चे कमलाकर रक्षे यांनी या उद्योगातील अडचणी आणि आव्हानांचा उलगडा केला. त्यांच्या मते, ‘दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली तरी अन्य व्यवहार अंशत:च सुरू आहेत. त्यामुळे हलवाई आणि फरसाण उद्योगाला लागणारा मोठय़ा स्वरूपातील कच्चा माल आमच्यापर्यंत पोहोचायला बराच वेळ जाईल.

सध्या घरातले वाणसामान मिळवतानाही कसरत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बेसन, तेल, तूप, साखर, दूध, खवा, गॅस या गोष्टी सहज उपलब्ध होणार नाहीत. विशेष म्हणजे आमच्याकडे अडकलेला कामगार वर्ग दिवसेंदिवस भावूक होत चालला आहे. त्यांची काळजी आणि सुरक्षा आम्ही घेत असलो तरी कुटुंबाची ओढ लागल्याने बरेचसे कामगार टाळेबंदीनंतर लगेचच गावी निघतील. त्यामुळे व्यवसाय सुरळीत होण्यासाठी अजून तीन ते चार महिने सहज लागतील.

मिठाई, फरसाण अशा पदार्थाना मोठी मागणी असल्याने दुकाने सुरू झाल्यावर लोक गर्दी करण्याची दाट शक्यता आहे. त्यात परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे दुकान सुरू करणे हे ग्राहक-विक्रेते-कामगार या तिन्ही वर्गासाठी धोकादायक आहे, असे ठाण्यातील ‘प्रशांत कॉर्नर’चे प्रशांत सकपाळ सांगतात.

‘मुंबई, ठाणे, पुणे या तीन प्रमुख शहरांचा अर्ध्याहून अधिक भाग अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केल्याने आसपासच्या परिसरातही व्यवसाय सुरू करणे जोखमीचे ठरेल. त्यात स्वच्छता, सुरक्षा, सामाजिक अंतर पाळून ग्राहकांशी व्यवहार करण्यासाठी नियोजन करावे लागेल. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले म्हणून व्यवसाय सुरू करण्यापेक्षा जबाबदारीने वागून सरकारला सहकार्य करणे अधिक मत्त्वाचे आहे,’ असेही ते सांगतात. त्यांच्या मते आपल्याकडे शिस्तीचा अभाव असल्याने घाईत निर्णय घेणे अयोग्य ठरेल.

अनेक व्यवसायांवर लाखोंचा तोटा

दादरमधील लोकप्रिय असलेले ‘सुरती फरसाण’चे जय रामावत सांगतात, ‘व्यवसाय जरी दादरमध्ये असला तरी कामगारवर्ग मुंबईबाहेरून येणारा आहे. त्यांच्या येण्याजाण्याची सोय नसताना कोणाच्या जीवावर व्यवसाय सुरू करावा असा प्रश्न आहे. माल आणणे, तो उतरवणे, पदार्थ बनवणे, ते विकणे हे काम मनुष्यबळाशिवाय शक्य नाही.’ त्यामुळे अद्याप तरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार नसल्याचे ते सांगतात. तर ‘चांदेकर स्वीट्स’चे राजेंद्र खांबकर या व्यवसायातील नुकसानीकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते ‘टाळेबंदीच्या काळात व्यवसाय ठप्प झाला. त्यात कामगारांचे पगार, त्यांची सुरक्षा याची सर्व जबाबदारी मालकांवर असल्याने प्रत्येकच व्यावसायिक आज लाखोंचा तोटा सहन करत आहे. पाडव्यानंतर आता अक्षय तृतीया हा मोठा सणही आमच्या हातून निसटल्याने नुकसान मोठे आहे. प्रभादेवीमध्ये आम्ही पदार्थ तयार करतो. तो परिसर अतिसंवेदनशील असल्याने कामगारांना कामावर बोलवणे शक्य नाही. शिवाय इतर ठिकाणी कारखाना हलवला तरी बाहेरून होणाऱ्या संसर्गाची भीती टाळता येत नाही. हा व्यवसाय अन्नपदार्थाचा असल्याने ग्राहक आणि कामगार दोघांचेही आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’