भायखळ्याच्या राणीबागेत शिरण्यापूर्वी डावीकडल्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’चं १० रुपयांचं तिकीट काढलंत, तर तिहेरी आनंद मिळण्याची खात्री आहे सध्या! या संग्रहालयातल्या सर्वच्या सर्व जुन्या कलावस्तू आणि मुद्दाम करवून घेतलेले देखावे हे मुंबई शहर आणि ब्रिटिशकालीन मुंबई इलाखा यांच्याबद्दल भरपूर माहिती देणारे आहेत. शिवाय इथंच स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त दिल्लीहून आलेलं ‘पार्ट नॅरेटिव्ह्ज’ हे प्रदर्शन भरलं आहे. गायत्री सिन्हा यांनी ‘फाळणी, स्थलांतर यांचे स्मरण’ या संकल्पनेभोवती गुंफलेल्या त्या प्रदर्शनाबद्दल आधीही याच स्तंभात कदाचित काहीजणांनी वाचलं असेल. आणखी तिसरं प्रदर्शनही या संग्रहालयाच्या मागच्या भागात १९ ऑगस्ट या ‘जागतिक छायाचित्रकला दिना’पासून सुरू झालंय. हे फोटोंचंच प्रदर्शन असलं तरी या छायाचित्रांचं सादरीकरण निराळं आहे. याच प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, छायाचित्रकारांनी नेहमीच्या कामापेक्षा निराळं काम इथं मांडलं आहे.
उझ्मा मोहसिन या एरवी ‘स्त्रीवादी छायाचित्रकार’ म्हणून ओळखल्या जातात, पण इथं त्यांनी केलेलं एक वेगळं काम पाहायला मिळेल. सार्वजनिक जागी बॉक्स कॅमेऱ्यानं फोटो काढून, लगेच ‘डेव्हलप’ करून देण्याचा व्यवसाय (जेव्हा चालत होता तेव्हा आणि तोवरच) करणारे भारतभूषण महाजन आणि त्यांचा मुलगा अमित महाजन या दोघांबद्दलचा एक छोटासा मूकपटच इथं पाहायला मिळतो आणि त्याआधी, चक्रावून टाकणारे भरपूर फोटो! ती सारी छायाचित्रं ‘फोटो काढवून घेण्यासाठी सज्जतेनं बसलेल्या’ अशा माणसांचीच असली, तरी त्यांवर किंवा आसपास अशी काही चिन्हं आहेत की, ते सारे फोटो ‘त्या वेळचे’ असणं शक्यच नाही! खरं आहे. उझ्मा मोहसिन यांनी या महाजन पितापुत्रांकडून काही ‘निगेटिव्ह’ घेतल्या आणि त्यावर पुन्हा काम केलं.. दोन फोटोंच्या एकत्रीकरणातून महाजन पितापुत्र जी ‘ट्रिक फोटोग्राफी’ करीत, त्यासारख्याच काहीशा पद्धतीनं- पण हल्लीच्या प्रतिमा वापरून- याच फोटोंना उझ्मा यांनी नवं रूप दिलं. म्हणजे उदाहरणार्थ, एका मुलीच्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर जणू पडद्यासारखे मोबाइलच्या कळफलकावरचे ‘इमोजी’ दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत, हनुमान छाती फाडून हृदयस्थ श्रीरामदर्शन घडवतो त्या प्रतिमेची आठवण येईल (पण अपमान वगैरे अजिबात होणार नाही) अशा पद्धतीनं एका तरुणाच्या शर्टाची बटणं उघडी आहेत आणि त्यातून आतल्या टीशर्टावर चित्र दिसतंय ते ‘इन्स्टाग्राम’च्या लोगोचं! त्या तरुणाचा फोटो जेव्हा केव्हा काढला गेला असेल, तेव्हा हे इन्स्टाग्राम नावाचं ‘फोटो शेअरिंग अॅप’ वगैरे काहीच नव्हतं.. मोबाइलही नव्हते. मग आत्ता इथं ते कसं काय? शिवाय दर दहाबारा फोटोंनंतर एक बदामाचे ठसे ठेवलेत आणि ते फोटोभोवतीच्या पांढऱ्या कागदावर मारण्याची मुभा लोकांना आहे, हे पाहिल्यावर लक्षात येतं : उझ्मा यांनी महाजन पितापुत्रांच्या फोटोंना हल्लीच्या ‘इन्स्टाग्राम संस्कृती’ची जोड दिली आहे. ते ठसे म्हणजे इन्टाग्रामवरले ‘लाइक’!
परक्या माणसांचे फोटो, तेही कुणा दुसऱ्याच फोटो-व्यावसायिकानं टिपलेले, त्यांवर काम.. हे सारं एकीकडे आणि याच दालनाच्या दुसऱ्या भागात, आपल्याच कुटुंबाकडे त्रयस्थपणे पाहणाऱ्या सुकन्या घोष यांच्या कलाकृती! पाच पेटय़ा (त्यापैकी एक खरोखरीची बॅग, बाकी चार लाकडी पेटय़ा, दोन छोटे सिगार-बॉक्स, आतून प्रकाश आणि पृष्ठभागी फोटो असणारे चार ‘लाइटबॉक्स’, दोन प्रोजेक्टरमधून एकाच आडव्या पडद्यावर दाखवली जाणारी सचेतपटासारखी फोटोंची मालिका.. असं या कामाचं दर्शनी रूप आहे. या पेटय़ांमध्ये आणि खोक्यांमध्ये डोकावलं, ‘लाइटबॉक्स’मधल्या प्रतिमांची गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पडद्यावर जे काही सुरू आहे ते पाहिलं, की चटकन लक्षात येतं : हे तर एकाच कुटुंबाचे जुने-जुने फोटो! पण कुटुंबाबद्दल, त्यांतल्या माणसांबद्दल काहीही सांगण्याचा हेतू ते इथं ठेवण्यामागे नाही. उलट, गतकाळाची संगती स्वानुभवातून लावताना चऱ्हाट टाळून, तपशीलही गाळून, जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथं दिसतो. हे ‘भावनिक अमूर्तीकरण’ आहे, असं शेजारच्या फलकावर (फक्त इंग्रजीत) म्हटलेलं आहे. ते कदाचित काहीजणांना पटेलही. शब्दप्रयोग पटला नसूनसुद्धा तो क्षणभर ग्राह्य मानला आणि विशेषत पडद्यावरल्या सचेतपटाकडे पुन्हा पाहिलंत, तर मात्र ‘घरातलं वादळ’ वगैरे संगती लागेल आणि सुकन्या यांचा खासगी अनुभव कदाचित आपल्यालाही (आपापल्या किंवा ओळखीच्या कुटुंबांसंदर्भात) परिचयाचा वाटेल. तो अनुभव वैश्विकच असणार, असंही वाटू लागेल.
दुसऱ्या दालनात श्रीनिवास कुरुंगटि यांनी न्यूयॉर्कमध्ये १९९२ ते ९७ या काळात न्यूयॉर्कमध्ये टिपलेले फोटो दिसतात. यापैकी अनेक फोटो हे आजच्या अमेरिकेतही काही प्रमाणात समाजबाह्यच मानले जाणाऱ्या (समलिंगी, अमली पदार्थसेवक आदी प्रकारच्या) लोकांचे आहेत. या लोकांना प्रथम पाहिले, तेव्हा कुतूहलापोटी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न श्रीनिवास यांनी केला. ते शक्य नाही, ओळख असल्याखेरीज हे लोक फोटो काढू देणार नाहीत, म्हणून ओळख वाढवली. ‘त्या’ लोकांना ओळखू लागल्यानंतर मात्र श्रीनिवास न्यूयॉर्कमधल्या प्रत्येकाकडे अधिक सजगपणे पाहू लागले. हा सारा प्रवास फोटो आणि स्लाइड-शो सदृश व्हीडिओतून इथे दिसतो.
यापेक्षा खूप निराळे, फक्त स्वतचेच फोटो पुढल्या भिंतीवर दिसतात. गोव्यातील ‘सेंटर फॉर आल्टर्नेटिव्ह फोटोग्राफी’ या संस्थेचे सहसंस्थापक एडसन बेनी डायस यांच्या या कलाकृती आहेत. ती संस्था फोटोग्राफीच्या जुन्या पद्धती टिकवण्याचं काम करते. त्याच पद्धती वा तंत्रं वापरून डायस यांचे फोटो सिद्ध झाले आहे. पण या फोटोंचा विषय आहे- डायस यांचं ‘मन’! एकाच प्रतलावर स्वतच्याच दोन वा तीन निरनिराळ्या आविर्भावांतल्या प्रतिमा या फोटोंमध्ये दिसतात. ‘भावनिक अमूर्तीकरण’सारखाच एखादा शब्द वापरायचा झाल्यास डायस यांच्या फोटोंना ‘भावनिक मूर्तरूपे’ ठरवता येईल.. पण ते तितकं साधं नाही. जरा निबिडच आहे.. भावनांसारखंच!
सार्वजनिक जागा, कुटुंब, शहर आणि मन..
या साऱ्यांमधल्या फोटोग्राफीच्या स्थानाचाही आढावा या प्रदर्शनातून आपसूक मिळतो. दिल्लीच्या ‘अल्काझी छायाचित्र संग्रहालया’चे संचालक रेहाब अल्लाना यांनी हे प्रदर्शन संकल्पित केलं आहे. प्रदर्शनाचे गुंफणकार या नात्यानं रेहाब यांनी घेतलेली वैचारिक आणि अन्य प्रकारची (म्हणजे छायाचित्रकार आणि त्याचं काम यांची भरपूर माहिती प्रेक्षकाला जिथल्या तिथे पुरवणं, प्रदर्शनाची खुबीनं मांडणी करणं.. वगैरे) मेहनत इथे दिसून येते. त्यामुळेच, जरूर पाहावं असं हे प्रदर्शन आहे.