मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई टोळीची दहशत निर्माण झाली असून त्याचा फायदा उचलून आता बिष्णोई टोळीच्या नावाने धमक्या देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माझगाव डॉक येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने दूरध्वनी आला असून आरोपींनी ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी तक्रारदार घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो बिष्णोई टोळीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, एका व्यक्तीचे ५५ लाख रुपये परत करण्यासाठी धमकावण्यात आले. सात दिवसांचा वेळ देतो. आमच्या विरोधात जाऊ नकोस, कुटुंब असलेला व्यक्ती आहेस. तुला जीवाची पर्वा नाही का ? असे सांगून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून प्रकरण मिटवून टाक, असेही आरोपीने धमकावले. तक्रारदाराने सुरूवातीला याकडे काणाडोळा केला. पण, नुकत्याच घडलेल्या घडामोडींनंतर त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला एका परिचित व्यक्तीने दिला. त्यानुसार, तक्रारदाराने शिवडी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३) अंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

u

बिष्णोई टोळीच्या नावाने धमकी येण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी सोमवारी अभिनेता सलमान खानला बिष्णोई टोळीच्या नावाने धमकी देण्यात आली होती. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ही धमकी आली होती. त्यात कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, धमकी देणाऱ्याने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणाचा वरळी पोलीस तपास करत असून वाहतूक पोलिसांना आठवड्याभरात पाच धमकीचे संदेश आले आहेत. त्यातील तीन प्रकरणामध्ये अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही धमकी देण्यत आली आहे. बिष्णोईच्या नावाने सलमान खानला धमकी देणारा संदेश कर्नाटकातील बंगळुरू येथून पाठवण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्या माहितीच्या आधारे वरळी पोलिसांनी बंगळुरू येथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असून विक्रम नावाच्या एका व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. तो वेल्डिंगचे काम करतो. या प्रकरणातील त्याच्या सहभागाचा तपास केला जात आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion designer in mazgaon dock received extortion from bishnoi gang call demanding rs 55 lakh mumbai print news sud 02