मुंबई : मालाड येथील मढ मार्वे मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. मात्र, या कामात नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तेथे वाहतूक पोलीस नसल्याने रात्रीच्या वेळी अनेकदा वाहतूक कोंडी होते. काँक्रीटीकरण करताना वाहतुकीला अडथळा होऊ नये, अशी सूचना असतानाही कंत्राटदारामार्फत कुठलीही उपायोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, रविवार किंवा अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशी अक्सा समुद्र किनाऱयावर जाणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते आहे. साधारण पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास खोळंबावे लागत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट ठेवून रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू केले आहे. मढ – मार्वे मार्गावरही रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. महापालिकेने गेल्या वर्षी या मार्गाचे काम हाती घेतले. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली. मात्र, सुरुवातीला संथ गतीने काम सुरु होते. शिवाय पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे थांबविण्यात आली. त्यानुसार मढ – मार्वे मार्गावरीलही काम थांबले. मात्र, पावसाळ्यानंतर या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. काँक्रीटीकरण सुरु असलेला रस्ता अरुंद असल्याने टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले जात आहे. मात्र त्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. तसेच, तेथे वाहतूक पोलीस नसल्याने रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्यांमुळे खणलेल्या रस्त्यातून चालताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे चंद्रकांत पाटील या स्थानिक रहिवाशांनी सांगितले. रस्ते कामादरम्यान वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन काँक्रिटीकरणाची कामे करावीत, असे आदेश महापालिकेने दिले होते. मात्र, कंत्राटदाराने कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काहीही उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर पाऊण तासाच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तासही लागतात, असेही स्थानिकांनी सांगितले.
संबंधित मार्गावर पुरेसे वाहतूक पोलीस तैनात करावे. तसेच, रस्ते काँक्रिटीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत नियमांची अंमलबजावणी होते का, याबाबत पालिकेने चौकशी करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तेथील रहिवाशांकडून केली जात आहे.