Igatpuri Amane Route Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील नागपूर-मुंबई थेट प्रवास केवळ आठ तासांत करण्याचे वाहनचालक, प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरील शेवटच्या इगतपुरी-आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १० मार्चपर्यंत अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई व नागपूरमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेतले. त्यानुसार ७०१ किमीपैकी नागपूर-इगतपुरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा रस्ता सध्या वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. मात्र नागपूर- मुंबईदरम्यान थेट प्रवास करण्यासाठी इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा टप्पा केव्हा सेवेत दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटचा टप्पा अभियांत्रिकी दृष्टीने सर्वात कठीण होता. या टप्प्यात तब्बल १२ बोगदे असून यापैकी एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लांबीचे आहेत.
अंतिम टप्प्यातील कामे प्रगतिपथावर
इगतपुरी – आमणे टप्प्यातील बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील कामे सुरू असून ही कामे १० मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.