नवरदेव पोलिस कोठडीत
चार वर्षांचा प्रेमाचा प्रवास..त्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय..पण, नव्या आयुष्याची सुरुवाच करण्याआधीच मुलाने आपले रंग दाखविले आणि सारं काही संपल. डोंबिवलीतील नवा पाडा भागात राहणाऱ्या एका युवतीच्या बाबतीत हा प्रकार घडला असून बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव प्रियकराने दोन लाखांच्या हुंडय़ाची मागणी केल्याने वधु-वर पक्षात हाणामारी झाली. यात नवरदेवालाही वधुकडील पक्षाने बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाले केले. मात्र, डोळ्यादेखत लग्नसोहळा मोडल्याने व्यथित झालेल्या वधुच्या वडीलांना सोमवारी सकाळी पक्षाघाताचा झटका आला.
बदलापूरातील प्रवीण बने याचे नवापाडा भागातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या दोघांच्या लग्नाला प्रवीणच्या कुटूंबियांनी सुरुवातील विरोध केला होता. त्यानंतर मात्र, लग्नास परवानगी दिली होती. त्यानुसार, रविवारी दोघांचा विवाह ठरला होता. डोंबिवलीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयामध्ये हा विवाह होणार होता.  मात्र, नवरदेव प्रवीण याने लग्न मंडपात येताच दोन लाख रुपये हुंडय़ाची मागणी केली. दरम्यान, भाजपचे उपाध्यक्ष शैलेश धात्रक आणि अन्य उपस्थितांनी मध्यस्थी करून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला.  तो  निष्फळ ठरला. त्यामुळे वधु कडील मंडळींनी त्याला चोप देऊन विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्याची वरात नेली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले. मुलीचे लग्न मोडले, या चिंतेते असतानाच सोमवारी त्यांना पक्षाघाताचा झटका आला, असे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. प्रवीण बने व त्याच्या आई-वडीलांना विष्णुनगर पोलिसांनी रविवारी अटक केली होती. या सर्वाना सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायाधीश शेट्टी यांनी तिघांना १८ डिसेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.     

Story img Loader