मुंबई : खेळणाऱ्या मुलांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या चौघांनी १७ वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी कुर्ल्यात घडली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
कुर्ला परिसरात राहणारा १७ वर्षीय मुलगा आणि त्याचे वडील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मुलाच्या वडिलांचे चिंधी गल्लीत कपड्यांचे दुकान आहे. त्यांना मदती करण्यासाठी मुलगा नेहमीप्रमाणे बुधवारी दुकानात गेला. बुधवारी दुपारी पावणे ३ च्या सुमारास वडिलांनी जेवायला जाण्यासाठी दुचाकी बाहेर काढण्यास सांगितली. वडील कामात व्यस्त असल्याने त्यांचा मुलगा दुचाकीकडे गेला. तेथे काही लहान मुले खेळत असल्याने त्याने त्यांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या मुलांनी त्याला शिवीगाळ केली आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेला मुलगा दुकानात पळाला. त्यानंतर काही वेळात चौर अनोळखी तरुण दुकानाच्या दिशेने धावत आले. त्यांनी शिवीगाळ करीत मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या मुलांनी लोखंडी सळीने हल्ला केला. मुलाच्या मदतीला धावलेल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडी सळीने प्रहार करण्यात आला, तसेच त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध सुरू केला आहे.