मुंबई : पावसात भिजल्यामुळे संतापलेल्या पित्याने १२ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुलाला मारहाम करणाऱ्या पित्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगा आई – वडिलांसोबत शिवाजी नगर परिसरात राहत असून जवळच तो खासगी शिकवणीला जातो. नेहमीप्रमाणे २२ जुलै रोजी तो शिकवणीवरून घरी आला. मात्र तो पावसात भिजून आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली. आईने त्याची सुटका केली. ही बाब मुलाच्या आईने एका सामाजिक संस्थेला सांगितली. त्यानंतर त्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वडीलांविरोधात तक्रार दाखल केली. मुलाच्या आईनेच तक्रार केल्याने पोलिसांनी तत्काळ मुलाला मारहाण करणे आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून वडिलांना अटक केली.

Story img Loader