नऊ वर्षांच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पतीचे हे कृत्य सुरुवातीला झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने त्याच्या कारवाया सुरूच राहिल्याने पवई पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही सज्जड पुरावे गोळा करत या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.
पवई परिसरात राहणाऱ्या आणि व्यवसायाने चालक असलेला २८ वर्षीय तरुण त्याची घरकाम करणारी पत्नी, आणि तीन मुलांसह राहत होता. सन २०१४ मध्ये या तरुणाने नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. त्या वेळी आईने आपल्या घरात तेच कमावते असून त्यांची जर तक्रार केली तर पोलीस त्यांना घेऊन जातील आणि आपण उपाशी राहू, असे मुलीला समजावले. त्याचवेळी तिनेनवऱ्याला जाब विचारल्यावर नवऱ्याने माफी मागत असा प्रकार पुन्हा करणार नाही, अशी हमी दिली. परंतु, सहा महिन्यानंतर पुन्हा त्याने मुलीवर बलात्कार केला.
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आईने थेट पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी या गुन्ह्य़ाचा तपास करीत वैद्यकीय अहवाल, फोरेन्सिक चाचणी आणि आईच्या जवाबासह दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल केले. पीडित मुलीचा जबाबही आरोपपत्राचा महत्त्वाचा भाग होता. सत्र न्यायालयात ज्योती सावंत आणि अंजली वाघमारे यांनी सरकारी काम पाहिले. न्यायाधीशांनी हीन कृत्य पाहून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अनुराग कांबळे

Story img Loader