वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील एका इमारतीत छापा घालून पोलिसांनी शस्त्रास्त्रांसह चौघांना अटक केली. या आरोपींनी दडवून ठेवलेली तब्बल ३१ प्राणघातक हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील पिता पुत्र असलेले मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
भक्ती पार्क येथील म्हाडाच्या इमारतीमधील एका फ्लॅटमधील दोघांकडे प्राणघातक हत्यारे असल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून बदयू इमाम उर्फ पाशा आणि आमिर रफिक शेख यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुले, एक रिव्हॉल्वर आणि १४ जिवंत काडतुसे आढळून आली. अधिक चौकशी करता त्यांनी शिवडी येथे आणखी शस्त्रात्रे दडवून ठेवल्याचे सांगितले. त्या ठिकाणी छापा घालून इमाम पाशा याचे वडील अकबर कैयमतजान पाशा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, १७ जिवंत काडतुसे, ९ तलवारी, २ चॉपर, २ कोयते, ३ खंजीर, ४ चाकू, २ वस्तरे, २ फायटर मूठ, १ लोखंडी कुऱ्हाड आदी शस्त्रे जप्त करण्यात आली.
इमाम पाशा आणि अकबर पाशा हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांवर शस्त्रास्त्रे कायद्यानुसार गुन्हाही दाखल होता, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.
प्राणघातक शस्त्रास्त्रांसह पितापुत्रांना अटक
वडाळ्याच्या भक्ती पार्क येथील एका इमारतीत छापा घालून पोलिसांनी शस्त्रास्त्रांसह चौघांना अटक केली. या आरोपींनी दडवून ठेवलेली तब्बल ३१ प्राणघातक हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील पिता पुत्र असलेले मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
First published on: 14-12-2012 at 04:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father son arrested with murderous wepon