मच्छीमार वापरत असलेल्या बिनतारी यंत्रणेत त्रुटी आहेत. त्यामुळे भविष्यात सागरी सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाचा अहवाल २००४ मध्ये ठाणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तसेच बिनतारी यंत्रणेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदींनी राज्य आणि केंद्र शासनाकडे सादर केले होते. परंतु या अहवालांकडे दुर्लक्ष केले गेले आणि सागरी सुरक्षा व्यवस्था भेदून कसाबसह इतर अतिरेकी मुंबईत दाखल झाले. २६/११च्या हल्ल्याला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्या परिस्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही.
२००८ साली मुंबईत अतिरेकी हल्ला झाला. कसाब आणि इतर अतिरेकी सागरी मार्गाने पोलीस, नौदल आणि सीमाशुल्क विभागाला चकमा देत मुंबईत घुसले. सागरी सुरक्षा भेदणे त्यांना सहज शक्य झाले. मच्छीमारांकडे असलेल्या बिनतारी यंत्रणेतून (वायरलेस सेट) पोलीस, नौदल आणि सीमाशुल्क विभागाचे संदेश ऐकू येत असल्याचे प्रकरण २००४ साली वसई पोलिसांनी उघड केले होते. जपानच्या एका कंपनीची बिनतारी यंत्रणा मच्छीमार वापरतात. त्या यंत्रणेमार्फत पोलीस, नौदलाचे गुप्त संदेश अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. वसईचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक वाघमारे यांनी अशी बिनतारी यंत्रणा जप्त करून संबंधित वितरकाला अटक केली होती. त्यामुळे ठाणे ग्रामीण विभागाचे तत्कालीन अधीक्षक रामराव पवार यांनी ‘नोडल ग्रुप कोस्टल सिक्युरिटी’ला १६ फेब्रुवारी २००४ रोजी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी भविष्यातील घातपाती कारवायांची शक्यता वर्तवली होती. मात्र या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ठाण्यासह चार सागरी जिल्ह्य़ांतील खासगी बिनतारी यंत्रणा जप्त करण्याची कारवाई सुरू केली होती. बिनतारी यंत्रणेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. के. जोशी यांनीही फेब्रुवारी २००४ मध्येच केंद्रीय दूरसंचार विभागाला पत्र लिहून बिनतारी यंत्रणेच्या या त्रुटीकडे लक्ष वेधले होते. पण झाले उलटेच! या प्रकरणातील आरोपींनी निरीक्षक वाघमारे आणि उपनिरीक्षक फाटक यांनी आपल्याकडे बिनतारी यंत्रणेची लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. कोकण परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग यांनी यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला आवश्यक तपासात अडथळा येत असल्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. परंतु या प्रकरणात वाघमारे यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद पडला आणि बिनतारी यंत्रणांवरील कारवाई थांबली. (वाघमारे यांना खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविल्याप्रकरणी तत्कालीन लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवर नुकताच गुन्हाही दाखल झाला आहे.)
..तर अनर्थ टळला असता
अतिरेक्यांनी मुंबईत दाखल होण्यापूर्वी भारताच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास केला होता. बिनतारी यंत्रणेतून पोलीस आणि नौदलाचे संदेश ज्या प्रकारे ऐकू येत होते ते पाहता त्यांना आयताच फायदा झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाकडे दिलेल्या अहवालाची गांभीर्याने दखल घेतली गेली असती, तर कदाचित मोठा अनर्थ टळला असता!
२६/११ हल्ला : सदोष बिनतारी यंत्रणा अद्याप कायम
मच्छीमार वापरत असलेल्या बिनतारी यंत्रणेत त्रुटी आहेत. त्यामुळे भविष्यात सागरी सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाचा अहवाल २००४ मध्ये ठाणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तसेच बिनतारी यंत्रणेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदींनी राज्य आणि केंद्र शासनाकडे सादर केले होते.
First published on: 19-03-2013 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fault in wireless technology using by sea fishermen