वांद्रे येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात मृत उंदीर सापडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित हॉटेलला काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली. या हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे सर्व नमुने बुधवारी घेण्यात आले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतील विविध हॉटेल व रेस्टॉरन्टमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आदेशही एफडीएने संबंधितांना दिले आहेत.
हेही वाचा >>> यापुढे बेकायदा इमारतींना महारेरा नोंदणी मिळणे कठीण! सीसी, ओसीची खात्री केल्यानंतरच नोंदणी
मुळचे मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेले तक्रारदार अनुराग सिंह (४०) कामानिमित्त सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ते बँकेत व्यवस्थापक पदावर काम करीत आहेत. वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ते मित्रासोबत जेवण्यासाठी गेले होते. त्यांनी मटण, चिकन मागवले. त्यावेळी एक चिकन, एक मटण थाळी, दोन दाल मखनी, दोन दही मटका व चार पराठे असे जेवण त्यांना मिळाले होते. त्यावेळी जेवत असताना त्यांच्या चिकनच्या थाळीमध्ये मृत उंदीर असल्याचे लक्षात आले. त्यांनी ढाब्याचा व्यवस्थापक व्हिवियन अल्बर्ट शिक्केराश (४०) यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सिंह यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदारांना जेवणात मृत उंदीर देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक आणि स्वयंपाक्याला अटक केली होती. याप्रकरणानंतर एफडीएने बुधवारी हॉटेलची पाहणी केली. तसेच हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून एफडीएने हॉटेलला काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.