मुंबई : दिवाळीनिमित्त विविध खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार भेसळीच्या संशयावरून, तसेच मिथ्याछाप कारणावरून विविध आस्थापनांवर धाडी घालून ३ कोटी ११ लाख रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर, फरसाण, वनस्पती घी, तेल, मिठाई, मसाले, सुकामेवा, रवा, आटा, मैदा, बेसन, स्कीम मिल्क पाऊडर, चीज, कार्बोनाटेड बेवरेजेस आदी जप्त करण्यात आले.
उत्सव काळात राज्यातील नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीनिमित्त अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ अन्वये विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत भेसळीच्या संशयावरून, तसेच मिथ्याछाप कारणावरून विविध आस्थापनांवर छापे घालून निरनिराळे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने १०२ अन्न आस्थापनांच्या तपासण्या केल्या आहेत. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर, फरसाण, वनस्पती घी, तेल, मिठाई इत्यादी अन्नपदार्थांचा ११ लाख ४ हजार ७४० रुपयांचा, तसेच मसाले, सुकामेवा, रवा, आटा, मैदा, बेसन, स्कीम मिल्क पाऊडर, चीज, कार्बोनाटेड बेवरेजेस इत्यादी अन्नपदार्थांचा ३ कोटी ५१ हजार २६३ रुपयांचा असा एकूण ३ कोटी ११ लाख ५६ हजार ३ रुपये किमतींचा साठा जप्त करण्यात आला आहे.
u
या तपासणीमध्ये खवा, पनीर, स्वीट मावा, तुप, बटर, फरसाण, वनस्पती घी, तेल, मसाले, मिठाई, सुकामेवा, रवा, आटा, मैदा, बेसन, स्कीम मिल्क पाऊडर, चीज, कार्बोनाटेड बेवरेजेस इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण १९५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच या आस्थापनांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत रा. करकळे यांनी सांगितले. तसेच भविष्यात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, सणासुदीच्या काळात विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थामध्ये भेसळ होत असल्यासंदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांनी केले आहे.