मुंबई : विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्या मे. व्ही. डी. हेल्थकेअर आणि मे. नरेंद्र मार्केटिंग या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापे टाकले. या छाप्यामध्ये तब्बल ३ लाख ४७ हजार १६० रुपये किमतीची सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली.

भिवंडीतील खापरिया बाबा कम्पाऊंड येथील गाळा क्रमांक २०१ मध्ये असलेली व्ही. डी. हेल्थकेअर ही कंपनी विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करीत असल्याची, तसेच या सौंदर्य प्रसाधानांची याच कंपाऊंडमधील गाळा क्रमांक १०२ मध्ये असलेल्या मे. नरेंद्र मार्केटिंग या कंपनीकडून विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयातील गुप्तवार्ता विभागास मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) वि. आर. रवी, रत्नागिरीतील सहायक आयुक्त (गुप्तवार्ता कोकण विभाग) शशिकांत यादव आणि ठाण्यातील औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी ३ एप्रिल रोजी खापरिया बाबा कम्पाऊंड येथील या कंपन्यांना भेट देऊन त्यांची तपासणी केली.

या तपासणीत मे. व्ही. डी. हेल्थकेयर येथे ‘एन. एम. रोगान बदाम शिरीन मिठा बादाम तेल’ या उत्पादनाचे उत्पादन सुरू हाते. त्यावर लावण्यात आलेल्या आवरणावर सौंदर्य प्रसाधन असे नमूद करण्यात आले होते. तसेच उत्पादनाच्या आवरणावर अन्नपदार्थ नोंदणीकरण क्रमांकही नमूद करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी उत्पादन सुरू असलेल्या सौंदर्य प्रसाधनाचा नमूना तपासणीसाठी घेऊन उर्वरित सर्व साठा जप्त केला. तसेच तेथील अन्य सौंदर्य प्रसाधनांची वेष्टने आणि आवरणाचे साहित्यही जप्त करण्यात आले.

मे. व्ही. डी. हेल्थकेयर या कंपनीवर कारवाई केल्यानंतर मे. नरेंद्र मार्केटिंग या कंपनीला भेट दिली. तेथे मे. व्ही.डी. हेल्थकेयर कंपनीने उत्पादित केलेल्या ‘एन. एम. ओनिअन हेयर ऑईल’ व ‘मुलतानी माटी पावडर’ ही दोन सौंदर्य प्रसाधने आढळली, त्याचेही नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, ठाण्याचे सहआयुक्त नरेंद्र सुपे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

घाटकोपरमध्येही कारवाई

घाटकोपर येथील मे. अर्बनकेयर लाईफ साइन्सेस एल. एल. पी. या घाऊक औषध विक्री पेढीची घटना दोन ते तीनवेळा बदलण्यात आली. मात्र घटना बदल केल्यानंतर मे. अर्बनकेयर लाईफ साइन्सेस एल. एल. पी. या कंपनीने नवीन परवाने घेतले नाहीत. तसेच त्यासाठी अर्जही केला नव्हता. पेढीच्या मालकांने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी घाटकोपरमधील मे. अर्बनकेयर लाईफ साइन्सेस एल. एल. पी. या घाऊक औषध विक्री पेढीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सुमारे ६१ लाख ९५ हजार ८७१ रुपयांचा औषधांचा साठा जप्त केला.