रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याने मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित रुग्णालयावर कारवाई करताना रुग्णाला दिलेल्या इंजेक्शनचा साठा जप्त केला. तसेच इंजेक्शन उत्पादक कंपनीलाही बाजारातील इंजेक्शन परत मागवण्याचे निर्देश एफडीएने दिले आहेत.
हेही वाचा- मुंबई विमानतळाच्या आसपासच्या रस्त्यांची तातडीची दुरुस्ती; महिन्याभरात काम पूर्ण करणार
मुंबईतील एका मोठ्या खासगी रुग्णालयामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता (ॲनेमिया) झाल्याने एका रुग्णावर उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला ओरोफर हे इंजेक्शन दिले. मात्र या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी एफडीएकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने रुग्णालयावर कारवाई केली. ही कारवाई १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये एफडीएने रुग्णालयातील ओरोफर इंजेक्शनचा साठ्याची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेला या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. तसेच जप्त केलेल्या इंजेक्शनचे काही नमूने एफडीएने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर त्यापुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहआयुक्त गौरीशंकर ब्याळे यांनी दिली.
हेही वाचा- ८४ झाडे कापण्याची परवानगी मिळणार का? आरे कारशेड प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
रुग्णालयावर केलेल्या कारवाईनंतर एफडीएने ओरोफर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला संबंधित इंजेक्शनचा बाजारामध्ये असलेला सदोष साठा परत मागवण्याचे निर्देश दिल्याचेही ब्याळे यांनी सांगितले.