मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळदरम्यान खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, बेसन, मैदा, सुकामेवा इत्यादींच्या मागणीत वाढ होते. वाढत्या मागणीमुळे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाणही वाढते. खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सप्टेंबरपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
उत्सवकाळात राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, तसेच खाद्यतेल, फरसाण, रवा, बेसन, मैदा, सुकामेवा आदींना प्रचंड मागणी असते. वाढत्या मागणीमुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान मिठाईचे उत्पादक विक्रेते व खवा – माव्याचे उत्पादक – विक्रेते यांची दुकाने, कारखान्यांची तपासण्या करण्यात येणार आहे. प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला दर महिन्याला १० उत्पादक-विक्रेत्यांच्या तपासण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच खवा, मावा यांची वाहतूक करणारी वाहने प्रामुख्याने खाजगी बसेस, ट्रक यांच्याबरोबरच पुरवठादारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. आवश्यक असेल त्या ठिकाणी धाडी घालून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने घ्यावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक; चार कंपन्यासह २५ जणांविरोधात गुन्हा
सणासुदीच्या कालावधीत कोणालाही विषबाधा होऊ नये याची दक्षता घ्यावी, यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच सणासुदीच्या विशेष मोहिमेच्या कार्यवाहीबाबतची माहिती मुख्यालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या Google spread sheet मध्ये दर सोमवारी न चुकता सादर करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उ. वि. इंगवले यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत.
जनजागृतीवर भर देणार फूड सेफ्टी ऑन व्हील्स या उपक्रमाच्या माध्यमातून अन्न नमुन्यांची चाचरी, अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण आणि ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांसोबत बैठका घेऊन त्यांना कायदेशीर तरतुदी, स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक सहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मिठाई उत्पादक व विक्रेते यांची बैठक बोलावून मिठाईचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री आरोग्यदायी वातावरणात करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.