विनायक डिगे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, मागील आठवडाभरापासून राज्यात वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असल्यामुळे नववर्षांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समारंभांमध्ये सहभागी होण्याची नागरिकांना धास्ती वाटू लागली आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठया प्रमाणात जंगी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, मॉल, कंपन्या, पब येथे स्वागत समारंभांची तयारी सुरू आहे. समारंभांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठया प्रमाणावर नोंदणीही करण्यात आली आहे. मात्र,  आता पुन्हा एकदा करोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे पाटर्यामध्ये सहभागी व्हावे की, नाही याबाबत नागरिकांकडून डॉक्टरांकडे विचारणा होत आहे. डॉक्टरही गर्दी, पार्टी टाळण्याचा, मुखपट्टी वापरण्याचा सल्ला देत आहेत.

हेही वाचा >>> मुंबईकरांवर करभार; मालमत्ता कराची १५ ते ४० टक्के वाढीव देयके, महापालिकेचा निर्णय

सध्या देशात सापडणाऱ्या १०० रुग्णांमध्ये साधारणपणे सात ते आठ रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सध्या पार्टीला जाण्याचे टाळावे. जाणे आवश्यकच असेल तर मुखपट्टी वापरावी. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले. 

आयोजकांकडूनही सूचना

पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट, मॉल, पबकडून आयोजित पाटर्य़ासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ही नोंदणी करताना आयोजकांकडून नागरिकांना मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतर राखणे अशा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत सूचना संकेतस्थळावरून देण्यात आल्या आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे घाबरण्याची गरज नसली तरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. समारंभांमध्ये सहभागी होताना मुखपट्टी वापरणे आवश्यक आहे. शक्य असल्यास पार्टी, समारंभ, गर्दी टाळणे उत्तम राहील.  – डॉ. विनायक सावर्डेकर, अधिष्ठाता, सेंट जॉर्जेस रुग्णालय

नववर्ष स्वागतासाठी योजलेले कार्यक्रम रद्द करणे शक्य असल्यास ते रद्दच करावे. समारंभ खुल्या मैदानात असतील तर जाण्यास हरकत नाही. परंतु, कार्यक्रम सभागृह किंवा बंदिस्त जागेत असल्यास शक्यतो टाळावेत.

– डॉ. सुभाष साळुंखे

माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of corona at new year celebration doctors advise to avoid crowd zws