संदीप आचार्य

पुराचा विळखा काही काळात ओसरेल मात्र करोनाचा विळखा आजही कायम असून पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असले तरी आता त्यांच्या माध्यमातून करोना पसरणार नाही ना, ही चिंता आरोग्य विभागाला भेडसावत आहे.

महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणाला मोठा फटका बसला आहे. शहरं पाण्याखाली गेली असून अनेकांचे जीवन यात संपले तर हजारो संसार उघड्यावर पडले आहेत. एनडीआरएफसह सरकारी यंत्रणांनी पुराने वेढलेल्या भागांतून हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असले तरी यातून आरोग्याचे काही प्रश्न निर्माण झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले या नागरिकांना प्रामुख्याने शाळा तसेच काही इमारतींमध्ये ठेवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून करोना सुरक्षिततेविषयीचे बहुतेक निकष येथे पाळणे शक्य नाही. घर संसार वाहून गेलेल्या या लोकांची मानसिकस्थिती आज करोना किंवा अन्य आजारांची काळजी घेण्याची नाही. ज्या शाळांमध्ये अथवा जेथे यांची राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे करोनासाठी आवश्यक सुरक्षित अंतर पाळणे आदी गोष्ट शक्य नसल्याने त्यांच्या माध्यमातून नव्याने करोना पसरण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सक्रिय रुग्णसंख्या जास्त असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा येथे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येकाची तात्काळ अँटिजेन चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. एकाच ठिकाणी राहणाऱ्या या नागरिकांमधून करोना पसरू नये यासाठी जास्तीतजास्त काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले. अर्थात ही काळजी घेताना या नागरिकांच्या मानसिक स्थितीचा विचार करून काय उपाययोजना करायच्या याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर, सातारा, सांगली शहरांतील अनेक भागांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. काही ठिकाणी पूर ओसरू लागला आहे. मात्र ८ जुलै ते २२ जुलै या काळात राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे सर्वात सक्रिय करोना जिल्हे म्हणून नोंदविण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये या काळात २०,५४७ करोना रुग्णांची नोंद असून राज्यातील सक्रिय रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १७.१६ टक्के आहे. सांगलीमध्ये १५,३८६ करोना रुग्ण असून १२.८५ टक्के राज्याच्या तुलनेत येथे सक्रिय रुग्णसंख्या आहे. सातारा येथे १२,१६१ रुग्णसंख्या तर १०.१६ टक्के सक्रिय रुग्ण प्रमाण आहे. रत्नागिरीमध्ये ४९०३ रुग्ण तर सिंधुदुर्ग येथे ३१६३ रुग्ण असून सोलापूरमध्ये ६४१६ सक्रिय करोना रुग्णसंख्या आहे. सक्रिय करोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये शासनाने करोनाला अटकाव करण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले होते. मात्र यातील अनेक जिल्ह्यांची पुरामुळे दैना उडाली असून आगामी काळात या भागात करोना रोखण्यासाठी लोकांना विश्वासत घेऊन कशाप्रकारे उपाययोजना करायच्या यावर आता आरोग्य विभागाला काम करावे लागणार लागणार असल्याचे डॉ सतीश पवार म्हणाले. कोल्हापूर हा करोना सक्रिय जिल्हा असून येथे ४०,८८२ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले तर सांगलीमध्ये १,६९,९९८ लोकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. सातारा येथे ७५३०,ठाणे ६९३०,रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे १२०० व १२७१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यातील बहुतेकांची महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी करोना सुरक्षित अंतराचे पालन होऊ शकत नाही. आरोग्य विभागाने जवळपास सर्व नागरिकांची अँटिजेन चाचणी तातडीने केली असली तरी गर्दीची जोखीम लक्षात घेऊन करोना पसरण्याचा धोका असल्याची भीती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader