मुंबई : एक डॉक्टर महिला दातांच्या उपचारासाठी वापरलेले २० लाख रुपये किंमतीचे उपकरण हार्बर मार्गावरील लोकलमध्ये विसरून रेल्वे स्थानकावर उतरल्या. मात्र मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलातील (आरपीएफ) जवानाने हे उपकरण संबंधित डॉक्टरला परत केले. त्यामुळे आरपीएफ कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> दादरसह मुंबईत पाच दिवसांत ५९३ किलो प्लास्टिक जप्त; दंडाची रक्कम ऐकून व्हाल थक्क
सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ वर शुक्रवारी सायंकाळी ५.०४ च्या सुमारास आलेल्या लोकलच्या एका डब्यात आरपीएफच्या जवानाला काळ्या रंगाची बॅग सापडली. तपासणी केली असता बॅगमध्ये लॅपटॉप आणि विविध विद्युत उपकरणे आढळली. बॅगमध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा संपर्क क्रमांक नव्हता. संपर्क क्रमांक मिळण्याच्या उद्देशाने आरपीएफ कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप सुरू केला. त्यात एक संपर्क क्रमांक मिळाला. या संपर्क क्रमांकावरून डॉ. आशिया अख्तर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. लोकलमध्ये विसरलेली बॅग आरपीएफच्या ताब्यात असल्याचे त्या सीएसएमटी येथील आरपीएफ ठाण्यात पोहोचल्या. बॅग आणि त्यातील सामग्री डॉ. आशिया अख्तर यांची असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आली.