‘साहियो’कडून प्रथा बंद करण्याची मागणी
जगभरातील दाऊदी बोहरा या मुस्लीम समाजात धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या खतना(सुंथा) प्रथेमुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण होत असून ही प्रथा मुलींचे लैंेगिक शोषण करणारी आहे. यासाठी कुटुंबातील महिलाच मुलींचा खतना करण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी ‘साहियो’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली.
वयाच्या सातव्या वर्षी बोहरा मुस्लीम महिलांना खतना या प्रथेतून जावे लागते. यामुळे जन्मभर त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागते असे संस्थेच्या इन्सीया दरीवाला यांनी सांगितले. ‘साहियो’ संस्थेने केलेल्या जगभरातील महिलांच्या सर्वेक्षणानुसार ६६ टक्के महिलांचा वयाच्या सहा किंवा सातव्या वर्षी खतना झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रथेचे समर्थन करण्यासाठी मुलीची लग्न करण्याची पात्रता वाढते, लैंगिक समाधान मिळते, परंपरा जपली जाते अशी अनेक कारणे या समाजातील व्यक्ती पुढे करीत असतात. जागतिक आरोग्य संघटनेनेही ही प्रथा अमानवी असून मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचे सांगितले असतानाही ही प्रथा अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाही. सध्या अनेक कुटुंबातील महिला या प्रथेचा विरोध करीत आहेत. मात्र समाजाचे दडपण असल्यामुळे खुलेपणाने बोलण्यासाठी घाबरत आहेत असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. मात्र या विषयाबाबत जनजागृती केली जर समाजाचा दृष्टिकोन बदलेल अशी त्यांना खात्री आहे.
खतना करण्याच्या अमानुष पद्धती
खतना करण्यासाठी तीन पद्धतीचा अवलंब केला जातो. पहिल्या पद्धतीत योनीलिंगावरील त्वचा कापली जाते. दुसऱ्या पद्धतीत योनीलिंग आणि त्याबाहेरील आवरणाचा काही भाग कापला जातो तर तिसऱ्या पद्धतीत योनीचा खुला भाग कमी करण्यासाठी स्त्रीयांचे बाह्य जननेद्रिंयांना टाके घातले जातात. अशा अमानुष पद्धतीने केल्या जाणाऱ्या या प्रथेचे परिणामही भयंकर असून खतना केल्यानंतर शारीरिक व मानसिक इजांना सामोरे जावे लागते.
मी सात वर्षांची असताना बाहुली घेऊन देण्याचे सांगून आई मला बोहरी समाजाच्या कार्यालयात घेऊन गेली. आतल्या खोलीत गेल्यावर तिथे असलेल्या महिलेने माझ्या योनीवर ब्लेडचे वार केले. ती कळ आताही माझ्या लक्षात आहे. त्यानंतर अनेक दिवस मी कळवळत होती. माझ्या आईनेच माझ्यासोबत असे का करावे. ही जीवघेणी प्रथा का आहे असा मला प्रश्न पडला. मात्र आजतागायत तो क्षण कायम मला आठवत राहतो.
– इशीया जोहारी (नाव बदललेले आहे)