मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाणे येथे एक माकडीण प्रसूती वेदनेदरम्यान बेशुद्ध पडली होती. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनविभगाशी संपर्क साधला. त्यानंतर माकडीणीला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला प्रसूती वेदना सुरू असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र, ती नैसर्गिकरित्या पिलाला जन्म देऊ शकत नसल्याने तिच्यावर सिझेरियन प्रसूती करण्यात आली आणि डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळे माकडीणीचा जीव वाचला.

माकडीणीला बराच वेळ प्रसूती वेदना होत होत्या. एक ते दीड तासानंतर अशक्तपणामुळे ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडलेली माकडीण नागरिकांच्या दृष्टीस पडली. नागरिकांनी तात्काळ वनविभगाशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभाग आणि ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. माकडीणीची स्थिती पाहता तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण परिस्थिती लक्षात येताच डॉक्टरांनी माकडीणीचे सिझेरियन करण्याचे ठरविले. शस्त्रक्रियेअंती माकडीणीचे मृत पिल्लू बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. ही क्रिया नैसर्गिकरित्या होणे शक्य नव्हती. तब्बल एका तासाहून अधिक काळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेमुळे माकडीणीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

साहाजिकच पिलाला गमविण्याल्यामुळे माकडीणीवर आघात झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तिला काही वेळ लागेल, अशी माहिती डॉ. प्रिती साठे यांनी दिली. दरम्यान , माकडांचा बुद्ध्यांक आणि भावनांक दोन्ही चांगला असतो. परिस्थितीशी ते पटकन जुळवून घेतात. जंगल हा त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र जंगल कमी झाल्याने ते शहरांमध्ये दिसू लागले आहेत. माकड आणि माणसांच्या संवेदना बऱ्याचशा सारख्या असतात. माकडांनाही माणसांसारखेच आजार होतात. माकडाची किंवा वानराची आई गेली तर माकड सैरभैर होतात. किंचाळणे, ओरडणे ही लक्षणे दिसून येतात. योग्य प्रकारे जगता यावे यासाठी संरचना करणे, शिकाऱ्यांपासून बचाव करणे, पिल्लांचे रक्षण करणे हे करण्याइतपत माकडे किंवा वानर चांगलीच बुद्धिमान असतात. एखाद्यावर प्रेम जडले तर त्याला धरून ठेवतात.

Story img Loader