मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा समुद्री कासव अंडी न घालताच समुद्रात निघून गेले. किनाऱ्यावर असलेल्या वर्दळीमुळे मादी कासव अंडी न घालताच माघारी समुद्रात गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जुहू समुद्रकिनाऱ्यावर आलेली मादी कासव अंडी न घालताच समुद्रात निघून गेली होती. दोन्ही घटनांमध्ये मादी कासव वर्दळीमुळे विचलित होऊन अंडी देऊ शकली नाही. त्यामुळे याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास जुहू समुद्रकिनाऱ्यावर समुद्री कासव अंडी घालण्यासाठी आले होते. कासव मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर आली त्यावेळी किनाऱ्यावर असलेल्या पर्यंटकांनी त्याचे छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली. तसेच यावेळी गोंधळही झाला.यामुळे कासव विचलित झाले. या गोंधळामुळेच मादी तेथे अंडी घालू शकली नाही.
येत्या दोन- तीन दिवसांत मादी परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्सोवा किनाऱ्यावर २०१८ मध्ये समुद्री कासवाने एक घरटे बांधल्याची नोंद झाल्याचे कोस्टल कन्झर्वेशन फाउंडेशनचे मरीन इकोलॉजिस्ट शौनक मोदी यांनी सांगितले. कासवांना अंडी घालण्यासाठी किनारा ही सुरक्षित जागा असते. मात्र अनेकांना हे माहीत नसते. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखीत झाले आहे.
रात्री गस्त घालणार
दरम्यान, जुहू किनाऱ्यावर रात्री गस्त घालण्यात येईल. याद्वारे कासवांवर लक्ष ठेवले जाईल अशी माहिती कांदळवन कक्ष-उत्तर कोकण विभागाचे विभागीय वनअधिकारी दीपक खाडे यांनी दिली. तसेच मुंबईच्या इतर समुद्रकिनाऱ्यावर कासव अंडी घालण्याचा प्रयत्न करत असल्यास वनविभागाला तात्काळ मदत क्रमांक १९२५ किंवा ७७१००००० वर संपर्क साधावून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
किनाऱ्यांवरील समुद्री कासवांच्या नोंदी
वर्सोवा किनाऱ्यावर समुद्री कासवाची अंडी असल्याचे पर्यावरणवादी अफरोज शाह यांनी २०१८ मधील अहवालात म्हटले होते. याचबरोबर मार्च, १९८३ साली केलेल्या सर्वेक्षणानुसार जुहू, वर्सोवा, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, मार्वे, गोराई, पालघर, डहाणू आणि सातपाटी या किनाऱ्यांवर कासवांची घरटी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम
सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात सागरी कासवाची ४७ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रात सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती. दरम्यान, राज्याच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर समुद्री कासवांची घरटी आढळतात.