लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मूत्राशयाचा त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री रुग्णलयात उपचारासाठी दाखल झालेल्या ३९ वर्षीय महिलेने शुक्रवारी पहाटे सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश रुग्णालय प्रशासनाने आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
जोगेश्वरी येथे राहणारी रबिया खानला (३९) मूत्राशायाचा त्रास होत असल्याने तिला गुरुवारी रात्री १० वाजता रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ती रुग्ण कक्षातून गायब झाली होती. त्यामुळे तिचा रुग्णालयात सर्वत्र शोध घेण्यात येत होता. दरम्यान, सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ती इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या फायर फायटिंग डक्टजवळ पडलेली आढळली. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या डोक्याला मार लागल्याने, तसेच शरीरावर ठिकठिकाणी दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-बाबा सिद्दीकी प्रकरण : आरोपींच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करणाऱ्याला अटक
चौकशी समिती स्थापन
या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या शरीरशास्त्र विभागाचे डॉ. मेहरा, ऑर्थोपेडिक विभागाचे डॉ. दास गुप्ता आणि जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुखदेव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे डॉ. मेढेकर यांनी सांगितले. समितीच्या अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.