देशभरातील शासकीय मनोरुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला मनोरुग्णांची पुरेशा सोयी-सुविधा व उपचाराअभवी स्थिती भयावह असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बहुतेक मनोरुग्णालयांमध्ये महिला रुग्णांना अंतर्वस्त्रापासून सॅनिटरी नॅपकिनपर्यंत अनेक अत्यावश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तसेच बहुतेक प्रकरणांमध्ये महिला रुग्णांना त्यांचे नातेवाईक पुन्हा घरी नेण्यास तयार नसल्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन कसे करायचे हाही एक गंभीर प्रश्न आहे. स्वच्छतागृहांपासून या रुग्णांच्या वैयक्तिक स्वच्छेतेबाबत आनंदी आनंद आहे.
‘राष्ट्रीय महिला आयोग’ आणि ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँण्ड न्यूरोसायन्सेस’ यांनी २०१५-१६ मध्ये देशभरातील निवडक दहा शासकीय मनोरुग्णालयांचा सखोल अभ्यास करून महिला मनोरुग्णालयांच्या परिस्थितीवर एक अहवाल तयार केला. देशातील सर्व राज्यांच्या आरोग्य सचिव तसेच प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांची दिल्ली येथे यासदर्भात नुकतीच एक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत हा अहवाल तसेच उपयायजोनांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललीता कुमारमंगलम यांनी हा अहवाल परिषदेत सादर केला. या अहवालात महाराष्ट्रातील पुणे येथील येरवडा मनोरुग्णालय, ठाणे मनोरुग्णालयासह देशातील दहा प्रमुख मनोरुग्णालयांतील महिला रुग्णांच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यात या महिला मनोरुग्णांना मिळणारे जेवण, वैयक्तिक स्वच्छता, झोपण्याची व्यवस्था, औषधोपचार तसेच मनसिक गरजांक डे किती लक्ष पुरवले जाते याचा पंचनामा करण्यात आला आहे. ठाणे व पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयातील सुमारे २६ टक्के महिलांनी आपल्याला मिळणाऱ्या जेवणाबाबत समाधानी नसल्याचे नमूद केले आहे. तसेच झोपण्याच्या व्यवस्थेबाबतही तक्रारी केल्या आहेत. बहुतके संस्थांमध्ये महिलांना आंतर्वस्त्र, कपडे, सॅनिटरी नॅपकीनची आबाळ होत असल्याचे समितीला दिसून आले आहे. त्याचप्रमाणे या रुग्णांच्या मानसिक स्वस्थ्यासाठी पुरेशा व्यवस्था नाहीत. प्रदीर्घ काळ राहावे लागणाऱ्या रुग्णांच्या तसेच बऱ्या झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाची स्वतंत्र योजना नसल्याचेही दिसून आले. जवळपास सर्वच मनोरुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात पदव्युत्तर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे दिसून आहे. गंभीर बाब म्हणजे मनोरुग्णालयांच्या जागा मोठय़ा असल्या तरी बहुतेक मनोरुग्णालयांच्या आवारात सुपरस्पेशालिटी रुग्णालय अथवा अन्य आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून त्यास या समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. (पूर्वार्ध)
समितीच्या शिफारशी
- रुग्णांना स्वच्छतेसाठी लागणारे कपडे, सॅनिटरी नॅपकिन तात्काळ देणे. अंघोळीची जागा अधिक संरक्षित असणे
- पुरेसे पंखे, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी हिटर. धार्मिक प्रार्थनेसाठी व्यवस्था
- पुरेशा प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक. कुटुंबियांशी संपर्क व्यवस्था. रुग्णालयाच्या आवारात पुनर्वसन केंद्र
- दीर्घकाळ वास्तव्य असलेल्यांचे ओळखपत्र व आधार कार्ड करावे. कायदेशीर मदत, वयोगटानुसार उपचाराची व्यवस्था करणे