कल्याण – उल्हासनगर मधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिसाला पोलीस ठाण्यातील एका कक्षात कोंडून ठेऊन एका माथेफिरू हल्लेखोराने या महिला पोलिसावर धारदार पातेने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शितल भगवंत बांबळे (३२) असे गंभीर जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. त्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतात. बाबासाहेब जंगलु सोनवणे (४२, रा. भीम कॉलनी, उल्हासनगर कॅम्प ४) असे हल्लेखोराचे नाव आहे.

हेही वाचा >>> ठाणे : यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा काढला

पोलिसांनी सांगितले, महिला पोलीस शितल बांबळे बुधवारी रात्रीपाळीसाठी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या. त्यांचे कर्तव्य गुरुवार सकाळपर्यंत होते. गुरुवारी सकाळी हवालदार बांबळे पोलीस ठाण्यात असताना पोलीस ठाण्यात स्वतावर धारदार पातेने वार करून रक्तबंबाळ अवस्थेत आरोपी बाबासाहेब सोनवणे आला. तो संतप्त झाला होता. अर्वाच्च बोलत होता. हवालदार बंबाळे यांनी आरोपी बाबासाहेब सोनवणे याला बसण्यास सांगितले. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाण्यासाठीची कागदोपत्रांची तयारी त्या करत होत्या. यावेळी संतप्त असलेल्या बाबासाहेबाला त्या शांत राहण्यासाठी समजवत होत्या. पोलीस ठाण्यातील आर. टी. पी. सी. कक्षात हा प्रकार सुरू होता. या कक्षात आपल्या खुर्चीवर हवालदार बंबाळे बसल्या होत्या. बंबाळे यांना काही कळण्याच्या आत हल्लेखोर बाबासाहेब सोनवणे याने त्या कक्षाचा दरवाजा बंद करून घेतला. हवालदार बंबाळे यांना वेठीस धरले.

हेही वाचा >>> ठाणे : शेअर बाजारातील गुतंवणूकीच्या माध्यमातून दोघांची लाखो रुपयांना फसवणूक

बेफाम झालेल्या हल्लेखोर बाबासाहेबाने हवालदार बंबाळे यांना काही कळण्याच्या आत त्याच्या जवळील धारदार पातेने बंबाळे यांच्या हात, गाल, मानेवर, कपाळावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. बंबाळे यांनी त्याला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. कक्षाचा दरवाजा बंद असल्याने त्यांना बचावासाठी काही करता आले नाही. बंबाळे यांनी ओरडा केल्यानंतर सहकारी धावत येऊन त्यांनी दरवाजा उघडून हल्लेखोर बाबासाहेबाला पकडले. त्याच्या हातामधील धारदार पात पहिले काढून घेण्यात आली. त्याला तातडीने उल्हासनगरमधील मध्यवर्ति शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर पोलीस बंदोबस्त उपचार सुरू आहेत. हवालदार बंबाळे वैद्यकीय उपचार घेत आहेत. बंबाळे यांच्यावर माथेफिरून हल्ला केल्याने पोलीस अधिकारी चक्रावून गेले आहेत. त्याने हा हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत.हवालदार शितल बंबाळे यांच्या तक्रारीवरून बाबासाहेबा विरुध्द सरकारी कामात अडथळा आणि जीव ठार मारण्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक व्ही. आर. गौड याप्रकरणाचा तपास करत आहेत.