राज्यात राजकीय घडामोडी तसेच राडेबाजीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढू लागला आह़े त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण, त्यांच्या समस्या, अशा प्राथमिक कर्तव्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे, अशी कबुली राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बुधवारी ठाण्यात दिली. तसेच पोलिसांवर कामाचा ताण वाढू नये, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमासाठी बुधवारी गृहमंत्री आर.आर. पाटील ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काही पक्षांकडून राडेबाजीची अपेक्षा नव्हती. त्यामुळे अशा पक्षांनी तरी असे प्रकार करू नयेत, अशी टोलेबाजीही त्यांनी ठाणे महापालिकेत नुकत्याच झालेल्या राजकीय मारहाणीबाबत या वेळी केली. पोलीस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करा पण, चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्याला नजरअंदाज करू नका, त्यांच्यामुळे पोलीस दलास कलंक लागत आहे, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. इमारत कोसळून निष्पापांचा मृत्यू होतो आणि बिल्डरच्या डायरीत पैशांच्या देवाण-घेवाणसंबंधी अधिकाऱ्यांची नावे सापडतात. त्यामुळे सर्वच विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भ्रष्टाचारातून बाहेर येण्याचे अंगीकारले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. बार रेडमध्येही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे सापडत आहेत. पोलीस दलात चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारी पोलीस महासंचालक आणि माझ्याकडे आल्या असून पुरावे मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा